बुलडाणा, दि. २७- बालवयात मनावर विज्ञानवादी विचारांची रुजवण झाली तर आयुष्यात नागरिक बुवाबाजीकडे वळत नाही. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जनजागृती करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर समिती १९८२ पासून संपूर्ण महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इ. प्रदेशात जनप्रबोधनाचे कार्य सातत्याने करीत आहेत. याच माध्यमातून समितीने अनेक बाबा, मांत्रिक, भगत, ज्योतिषी यांचा जाहीर भंडाफोड करून त्यांचं पितळ जनतेसमोर उघड केले आहे; मात्र आजही अनेक ठिकाणी चुकीच्या रूढी, परंपरा सुरू असून, अंधश्रद्धेमुळे अनेकांचे बळी जात असल्याचे दिसून येते. समाजातील अंधश्रद्धा दूर होऊन विज्ञानवादी विचार रुजविण्यासाठी अंनिसतर्फे आतापर्यंत शेकडो कार्यशाळा, व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यात अंनिसच्या प्रा. प्रतिभा भुतेकर, दत्ताभाऊ सिरसाठ, शिवाजी पाटील, प्रमोद टाले व किशोर वाघ आदींनी जवळपास ४0 कार्यक्रम घेतले. याशिवाय सैलानी यात्रेत दरवर्षी अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते, तर विविध बचत गटाच्या कार्यक्रम जनजागृतीसाठी पत्रके वाटली. या कार्यक्रमाला विविध ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येत आहे
अंनिस विद्यार्थ्यांमध्ये करणार अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत जागृती
By admin | Published: January 28, 2017 2:29 AM