साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सोशल फोरमच्या वतीने आयोजित अण्णा भाऊ साठे पुण्यतिथी ते जयंती ऑनलाइन व्याख्यानमालेत शनिवारी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे होते. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय राहिले आहे. श्रीमंतांकडून होणारे श्रमिकांचे शोषण आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडून होणारी सामाजिक व धार्मिक पिळवणूक या दोन गोष्टींचा त्यांनी उभ्या आयुष्यात प्रचंड तिरस्कार केला. त्यांनी आपल्या साहित्यातून सर्वसामान्यांची वेदना सांगण्याचे काम केले. केवळ दीड दिवस शाळेत जाणारी व्यक्ती ३५ कादंबऱ्या, १३ लोकनाट्य, १३ कथासंग्रह, १५ पोवाडे, ३ नाटकं, १ प्रवासवर्णन, १ शाहिरी पुस्तक एवढी मोठी साहित्यसंपदा निर्माण करते, यावरून त्यांची साहित्यसम्राट ही पदवी सार्थ ठरते, असे मत जयश्री शेळके यांनी व्यक्त केले. त्यांच्या वैजयंता, आवडी, वारणेचा वाघ, चित्रा, फकिरा, माकडीचा माळ, अलगुज या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले आहेत. जगातील २२ भाषेत त्यांचे साहित्य प्रकाशित झाले आहे. यावरून त्यांची साहित्यातील उंची आपल्या लक्षात येते. जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांनी आता बदलले पाहिजे, असा विचार त्यांनी टिटवाळा येथील शेतकरी परिषदेत मांडला. दादर येथील पहिल्या दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरली नसून श्रमिकांच्या तळहातावर तरली असल्याचा क्रांतिकारी विचार त्यांनी या विचारमंचावरून मांडला, असेही शेळके यांनी स्पष्ट केले.
महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम
अण्णा भाऊ साठे आपल्या शाहिरी, पोवाडा, वग, नाटक, वंदनगीताची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून करायचे. त्यांनी रशियात शिवरायांचा पोवाडा सादर केला. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा, सामाजिक न्यायाचा विचार त्यांनी आपल्या साहित्यातून मांडला. त्यांनी आपली फकिरा ही कादंबरी बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केली आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून महापुरुषांच्या विचारांची साखळी जोडण्याचे काम केले, असे मत या व्याख्यानमालेत व्यक्त करण्यात आले.