पहिल्या टप्प्यातील ३१ पैकी १२ रेतीघाटाचा लिलाव दोन समित्यांनी दिलेल्या पर्यावरणीय अनुमतीनंतर झाले होते. २१ जानेवारी रोजी लिलाव पार पडल्यानंर निर्धारित ४ कोटी ४८ लाख रुपये किमतीच्या तुलनेत प्रशासनास ७ कोटी ९७ लाख रुपयाचा महसूल प्राप्त झाला होता. मात्र या पहिल्या टप्प्यातील रेतीघाटाच्या लिलावाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या अैारंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र ती फेटाळण्यात आली होती. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील रेतीघाटाच्या लिलावाची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, प्रभारी अपर जिल्हाधिकारी दिनेश गीते यांच्या मार्गदर्शनात जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. विनय राठोड व सहकाऱ्यांनी आता पहिल्या टप्प्यात राहिलेल्या या १४ रेतीघाटाच्या लिलावाची पूर्वतयारी सुरू केली आहे. यामध्ये निमगाव गुरू व देऊळगाव मही भाग २, नारायणखेड (ता. देऊळगाव राजा), भूमराळा, सावरगाव तेली, चांगेफळ, सावरगाव तेली (ता. लोणार), पलसोडा, पातोंडा, भोटा, रोटी, रोटी ब., येरळी, टाकळी वतपाल, खेडेगाव (ता. नांदुरा) आणि शेगाव तालुक्यातील भोनगाव व बोडगाव येथील रेतीघाटाचा समावेश आहे.
--१७ फेब्रुवारीपासून प्रारंभ--
या लिलावाची प्रक्रिया १७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. २२ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी होईल. २३ फेब्रुवारीला ऑनलाईन निविदा भरण्यास प्रारंभ होऊन ४ मार्चपर्यंत त्या भरल्या जातील. ५ मार्च रोजी ई-लिलाव होईल.
--अवैध उत्खनननास बसेल चाप--
मधल्या दोन वर्षात न्यायालयीन प्रकरणामुळे जिल्ह्यातील रेतीघाटाचे लिलाव रखडले होते. त्यातच कोरोना संसर्गाचाही यास फटका बसला होता. त्यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या जवळपास ३० हजार कामगारांच्या चरितार्थाचा प्रश्नही निर्माण झाला होता. मात्र आता टप्प्याटप्प्याने लिलाव होत आहेत. मधल्या काळात लिलाव रखडल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात जालना जिल्ह्यासह नंदूरबार आणि गुजरातमधून रेती येत होती. त्याचे दरही जास्त होते, सोबतच अवैध रेती उत्खननाचे प्रकारही वाढले होते. या प्रकारातूनच संग्रामपूर तालुक्यात आपसी वाद होऊन एकाचे ट्रॅक्टरही पेटवून देण्यात आले होते.