लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्या विरोधात खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रार मुक्ताई नगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. खामगाव शहर पोलिसांनी या संदर्भातील सर्व सोपस्कार शुक्रवारी पूर्ण केले.
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘आप’च्या पदाधिकारी अंजली दमानिया यांनी माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे यांच्यावर आरोप करताना तसेच खडसे यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडविण्याच्या दृष्टीकोनातून चोपडा अर्बन को-आॅप बँक लि. चोपडा या बँकेचे खोटे चेक अस्तित्वात आणले. हे चेक खरे म्हणून न्यायालयात सुध्दा वापरले. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबतच भारतीय जनता पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी अंजली दमानिया यांनी न्यायालयाचीही फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यासाठी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये माधव पाटील यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनास्थळ हे मुक्ताईनगर असल्यामुळे खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनप्रमाणेच शुक्रवारी शहर पोलिसांनी देखील कायदेशीर प्रक्रीयापूर्ण करून माधव पाटील यांची तक्रार पुढील कारवाईसाठी मुक्ताईनगर पोलिसांकडे वर्ग केली आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोलिसांनी दमानिया यांच्या विरोधात गुन्हा न दाखल केल्याबाबत खंत व्यक्त केली.
माजी मंत्री खडसेंचीही तक्रार!
माजी मंत्री एकनाथ खडसे यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने न्यायालयाची फसवणूक करणाºया अंजली दमानिया यांच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात १३ तक्रारी दाखल आहेत. यापैकी २ तक्रारी मुक्ताईनगरकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दाखल केलेल्या उपरोक्त आशयाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसांनी अंजली दमानिया यांच्या विरोधात अप क्रमांक ११६/१८ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३७९, ३८०, १२० ब भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
अंजली दमानिया यांनी फसवणूक केल्याप्रकरणी माधव पाटील यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनास्थळ मुक्ताई नगर आहे. या ठिकाणी अशा आशयाच्या तक्रारींवरून तेथे दमानिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे माधव पाटील यांची तक्रार शुक्रवारी मुक्ताईनगर येथे वर्ग करण्यात आली आहे.
- संतोष ताले, पोलिस निरिक्षक, शहर पोलिस स्टेशन, खामगाव.