सिंदखेडराजा (बुलडाणा) : साखरखेर्डा येथील भारतीय स्टेट बँक कॅश व्हॅन दरोडा प्रकरणातील आणखी एका आरोपीला २९ डिसेंबरच्या रात्री जालना जिल्हय़ातील निरखेडा येथून साखरखेर्डा पोलिसांनी अटक केली असून ३0 डिसेंबर रोजी सकाळी त्याला साखरखेर्डा पोलीस स्टेशनला आणले आहे. साखरखेर्डा येथे २६ डिसेंबर रोजी दुपारी २.३0 वाजता भारतीय स्टेट बँक शाखा साखरखेर्डाच्या कॅश व्हॅनवर दरोडा टाकून ३0 लाख रुपयांची रोकड लंपास झाली होती. या दरोड्यात वाहनचालकासह कॅशियर, शिपाई आणि गार्ड यांना मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. घटना घडताच जिल्हय़ातील पोलिसांनी नाकेबंदी केल्याने आरोपींना पकडण्यात यश आले. भुमराळा आणि चांगेफळ शिवारात पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्नही आरोपींनी केला. पोलिसांनी भुमराळा परिसरातील अख्खे जंगल पायाखाली घालून लहू पंडित जाधव, आकाश पांडुरंग थेटे, सुदर्शन थेटे या तिघांना रात्रीच पोलिसांनी जेरबंद केले. तर नाशिक येथे फरार झालेले तीन आरोपी नाशिक रोड पोलिसांनी अटक केले. यात मुख्य सूत्रधार असलेला जालना जिल्हय़ातील सावरगाव येथील निलंबित पोलीस शिपाई शिवाजी भागडे, ज्ञानदेव ऊर्फ बाल्या खरात, गोविंद जगन्नाथ डोंगरे यांना अटक केली होती. तर आज सकाळी ठाणेदार नीलेश ब्राह्मणे यांनी लहू जाधव याचा साळा जालना जिल्हय़ातील निरखेड येथील परमेश्वर विष्णू राठोड यास अटक केली आहे. या संपूर्ण घटनेचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सूर्यकांत बांगर, ठाणेदार नीलेश ब्राह्मणे हे करीत आहेत.
दरोडा प्रकरणात आणखी एकाला अटक
By admin | Published: December 31, 2014 12:28 AM