चिखली : कोरोना महामारीशी लढा देण्यासाठी अनुराधा मिशनने सुरू केलेल्या रुग्णसेवा यज्ञाला सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी चिखली येथे दिली.
अनुराधा मिशनच्यावतीने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे डेडिकेटेड कोविड सेंटरला सुरूवात करण्यात आली.
याठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पही उभारण्यात येत आहे. राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ९ मे रोजी कोविड सेंटरच्या शुभारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व अनुराधा मिशनचे राहुल बोंद्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक राहुल बोंद्रे यांनी केले. कोरोना कालावधीत अनुराधा अभियांत्रिकीच्या परिसरात १५० खाटांचे कोविड विलगीकरण केंद्र, रुग्णांना ने-आण करण्याकरिता वाहन व्यवस्था, परराज्यातील अनेक नागरिकांसाठी बसची व्यवस्था, गरजू लोकांपर्यंत अन्नधान्याचा पुरवठा अनुराधा मिशनच्या माध्यमातून यापूर्वी केले असल्याचे सांगून सद्यस्थिती पाहता १०० खाटांचे सुसज्ज कोविड केअर सेंटर तसेच ऑक्सिजनची गरज लक्षात घेता ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, श्याम उमाळकर, आमदार राजेश एकडे, रविकांत तुपकर, प्रा. नरेंद्र खेडेकर, जि. अध्यक्षा मनीषा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रभूकाका बाहेकर, संजय राठोड, जि.प. सभापती ज्योती पडघान, दीपक देशमाने, अशोकराव पडघान यांच्यासह विश्वस्त सिद्धेश्वर वानेरे, प्राचार्य डॉ. अरुण नन्हई, प्राचार्य डॉ.के.आर. बियाणी, प्राचार्य आर.एच. काळे, प्राचार्य आर.आर. पागोरे, डॉ. मोरे, डॉ. कोकाटे, सचिन बोंद्रे, प्रशांत देशमुख आदी उपस्थित होते. संचालन प्रा.यू.एम. जोशी यांनी केले.
लोकसहभागातून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
सद्यस्थितीत गरज पाहता अनुराधा मिशनने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प लोकसहभागातून हाती घेतला आहे. या प्रकल्पाकरिता येणाऱ्या खर्चापैकी १० लक्ष रुपये संस्थेचा वाटा व इतर निधी लोकसहभागातून उभारण्यात येत आहे. दरम्यान, अनुराधा मिशनद्वारे यापूर्वी १५० रुग्णांसाठी विलगीकरण सेंटर उभारण्यात आले आहे. त्या पश्चात आता १०० खाटांचे सर्व सुविधांयुक्त कोविड हॉस्पिटलचा आज शुभारंभ ना.डॉ. शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले.