लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या संचालक मंडळाची निवडणूक ११ जून रोजी होत असून या निवडणुकीत पणन व सहकारी जिनिंग प्रेसिंग सहकारी संस्था मतदार संघ खामगाव विभागातून एका जागेसाठी राजेंद्र किसनराव ठाकरे वडगाव वाण व संग्रामपूर व प्रसेनजित किसनराव पाटील मडाखेड ता. जळगाव जामोद यांचे अर्ज वैध ठरले आहेत. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.ही निवडणूक सन २०१७ ते २०२२ या पाच वर्षासाठी संचालक मंडळ निवडीसाठी असून खामगाव विभागातून मागच्या निवडणुकीत प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक मंडळ हे १७ जणांचे असून खामगाव विभागातून एका संचालकाची निवड केली जाते. यावेळी भाजपाचे राजेंद्र ठाकरे यांचा अर्ज वैध ठरल्याने यावेळी पणन व सहकारी जिनिंग मतदार संघ खामगाव विभागातून विद्यमान संचालक प्रसेनजित पाटील व राजेंद्र ठाकरे यांच्यात चुरस होण्याची शक्यता दिसत आहे. खामगाव विभागात या निवडणूकीसाठी एकुण १६ मतदार आहेत. शेगाव, खामगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा, सिंदखेडराजा व चिखली असा बारा तालुका खरेदी विक्री संघाचे प्रत्येकी एक याप्रमाणे नामनिर्देशित केलेला प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे. तसेच जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली व मलकापूर येथील जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थांचा प्रत्येकी प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी या निवडणुकीत मतदान करणार आहे, असे एकुण १६ मतदार या निवडणुकीत मतदान करतील. सन २००४ व सन २०११ अशा दोन्ही निवडणुकीत खामगाव विभागातून प्रसेनजित पाटील हे अविरोध निवडून आले होते. त्यामुळे त्यांना पणन महासंघ संचालक म्हणून १३ वर्षाचा कालावधी मिळाला. यावेळी सुध्दा ही निवडणूक जिल्ह्यातील वरिष्ठ नेते एकत्रित येवून अविरोध करतील अशी प्रसेनजित पाटील यांना आशा आहे. अर्थात ३१ मे नंतरच याबाबतची स्थिती स्पष्ट होईल. अविरोधाची शक्यता कमीविद्यमान संचालक व काँग्रेस नेते प्रसेनजित पाटील आणि भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व माजी जि.प. सदस्य राजेंद्र ठाकरे यांच्यामध्ये यावेळी चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे. कारण या दोघांपैकी कोणीही रिंगणातून माघार होईल सध्यातरी वाटत नाही. दोन्ही उमेदवारांची विजयाबाबतची चाचपणी सुरू आहे. विजयी होण्यासाठी नऊ मतांची गरज आहे. या नऊ मतांचे समीकरण मांडणे सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे वरिष्ठ नेते या निवडणुकीबाबत एकमेकांशी कशी हात मिळवणी करतात. यावरच जय-पराजयाचे समीकरण राहणार आहे. ३१ मे ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
खामगाव विभागातून ठाकरे, पाटील यांचे अर्ज वैध
By admin | Published: May 19, 2017 12:12 AM