लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खरीप हंगाम २०१७ साठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखून कृषी क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखता येणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे.जिल्ह्यातील कर्जदार शेतकाऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पीक विमा बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित ठेवण्यात आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखीम स्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी, याकरिता विमा हप्ता सीएससीमार्फत आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१७ पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. असा आहे विम्याचा हप्ता (प्रति हेक्टर)- खरीप ज्वारी : विमा संरक्षित रक्कम २४ हजार, हप्ता ४८० रुपये - मका : विमा संरक्षित रक्कम २५ हजार, हप्ता ५०० रुपये - तूर : विमा संरक्षित रक्कम ३० हजार, हप्ता ६०० रुपये - मूग : विमा संरक्षित रक्कम १८ हजार, हप्ता ३६० रुपये - उडीद : विमा संरक्षित रक्कम १८ हजार, हप्ता ३६० रुपये - भुईमूग : विमा संरक्षित रक्कम ३० हजार, हप्ता ६०० रुपये - सोयाबीन : विमा संरक्षित रक्कम ४० हजार, हप्ता ८०० रुपये - तीळ : विमा संरक्षित रक्कम २२ हजार, हप्ता ४४० रुपये - कापूस : विमा संरक्षित रक्कम ४० हजार, हप्ता २००० रुपये राहणार आहे.
नऊ पिकांसाठी विमा योजना लागू
By admin | Published: July 08, 2017 1:06 AM