बुलडाणा, दि. १५- लोणार पर्यटन विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत बुधवारी मंजुरी देण्यात आली. यावेळी विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिले.पर्यटन विकास आराखड्यास मंजूरी देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी वर्षा निवासस्थानी समितीची बैठक झाली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, आमदार प्रशांत बंब, मुख्य सचिव सुमित मल्लिक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, रायगड, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड येथील जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पर्यटन विकास आराखडा तयार करताना पर्यटकांसह स्थानिकांच्याही सोयी-सुविधांचा प्राधान्याने विचार करावा. तसेच विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना त्याच्या कामाचे नियोजन व दर्जा याकडे विशेष लक्ष द्यावे. रायगड किल्ल्यावरील कामांना प्राधान्य देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. लोणार पर्यटन विकास आराखडा ९३४६.५१ लाख रुपयांचा असून दुर्गा टेकडी येथे रिसर्च सेंटर, प्रयोगशाळा, पर्यटक माहिती केंद्र, तारांगण व संग्रहालय बांधणे, सरोवराभोवती सुरक्षा कक्ष, पदपथ, व्हुयविंग प्लॅटफॉर्म, सूचनाफलक, प्रदूषणविरहित बसेस व परिसर सुशोभीकरण करणे, ऐतिहासिक मंदीराचे संवर्धन करणे, प्रथमोपचार केंद्र, ध्यानसाधना केंद्र, प्र तीक्षागृह, प्रयोगशाळा व सभागृह, शासकीय इमारतीचे रुपांतर, क्लॉक रुम इत्यादी कामांचा समावेश आहे.
लोणार पर्यटन विकास आराखड्याला मंजुरी
By admin | Published: March 16, 2017 3:20 AM