या अंदाजपत्रकात महसुली जमा, भांडवली जमासह संपूर्ण वर्षात होणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. नगर परिषदेला कर स्वरूपात जमा होणारे उत्पन्न ज्यात मालमत्ता कर, वृक्ष कर, जाहिरात, स्वच्छता कर यातून जमा होणारे उत्पन्न १ कोटी ६४ लाख ७५ हजार इतके अंदाजित करण्यात आले आहे. करमणूक कर, अनुदान, मुद्रांक शुल्क, व्यवसाय कर, गौनखनिज अनुदानाकरिता १८ लक्ष रुपये अंदाजित धरण्यात आले आहेत. महसुली अनुदानापोटी १ कोटी ७५ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे. परिषद क्षेत्रात असलेल्या मालमत्तांपासून होणारे उत्पन्न ५६ लक्ष रुपये दाखविण्यात आले आहे. फी आकार व दंडाच्या माध्यमातून येणारे उत्पन्न ७५ लाख ७७ हजार आहे. भांडवली जमा यामध्ये शासनाकडून येणाऱ्या विविध हेड अनुदानाचा समावेश असून, याद्वारे ५० कोटी २ लक्ष रुपयांची तरतूद आहे. या सर्व हेडच्या माध्यमातून पालिकेला एकूण ५४ कोटी ९९ लक्ष ५२ हजारांचे उत्पन्न अंदाजित करण्यात आले आहे. महसुली खर्चासाठी ५३ कोटी ६२ लक्ष ९९ हजार ३७८ रुपये अंदाजित करण्यात आले आहे. ज्यात आस्थापना खर्च २ कोटी ९० लाख पाच हजार रुपये, प्रशासकीय खर्चापोटी १ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये, मालमत्ता दुरुस्ती व परीक्षण ६५ लाख रुपये, राखीव निधी व संकीर्ण खर्च म्हणून ५० लाख रुपये, तर स्थिर व जंगम मालमत्ता, तसेच प्रगतिपथावर भांडवली कामे यासाठी अंदाजपत्रकात ४८ कोटी ५९ लाख ६९ हजार ३७८ रुपयांची तरतूद आहे. पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी शिलकीचे अंदाजपत्रक तयार करून नगराध्यक्षांना सोपविले. या अंदाजपत्रकानुसार पालिकेची आगामी वर्षासाठीची आर्थिक वाटचाल स्पष्ट होणार आहे.
यावेळी लेखाधिकारी शालिक टेकाम, पाणीपुरवठा अभियंता सतीश वाकडे, बांधकाम अभियंता इंगोले, वरिष्ठ लिपिक उसरे आदींची उपस्थिती होती.