बुलडाणा : मोताळा तालुक्यातील पलढग धरणावर उभारण्यात येणाऱ्या निसर्ग पर्यटन विकास आराखड्यास अंतिम मंजुरी देण्यात आली आहे. तसेच निधी उपलब्धतेसाठी वन विभागास आदेश देण्यात आले. शिवाय वरवंड राज्य महामार्ग ते बोरखेड, जयपूर शेंबा रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली. याविषयी मुंबई येथे वनमंत्री संजय राठोड यांच्या दालनात आमदार संजय गायकवाड यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी राेजी बैठक झाली.
बुलडाणा विधानसभा मतदार संघातील विकासात्मक विविध कामांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शेंबा, जयपूर, बोरखेड वरवंड रस्ता राज्य मार्ग अर्थसंकल्पात मंजूर आहे. तसेच या कामाची ई-निविदा पूर्ण होऊन खडीकरणाचे काम पूर्ण झाले आहे; परंतु डांबरीकरणाच्या कामासाठी मंजुरी मिळत नव्हती. आमदार संजय गायकवाड यांनी मागणी रेटून धरली. त्यामुळे त्यास बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे ज्ञानगंगा अभयारण्यात असलेल्या देव्हारी गावाच्या पुनर्वसनासाठी ५७.७ लक्ष रुपयांची तरतूद करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले. यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला १० लक्ष रुपये मिळणार आहेत. तसेच ज्ञानगंगा अभयारण्यात वास्तव्यास असलेल्या सीएन वाघासाठी मादी वाघ उपलब्ध करण्याचे आदेश काढण्यात आले. त्याचप्रमाणे राहेरी ते आमदरी हा दोन कि.मी.चा घाटरस्ता तसेच नळकुंड ते कुर्हा रस्ताकामासही मंजुरी देण्यात आली. राजूर ते बुलढाणा घाटातील एकेरी रस्त्याचे प्रशासनाकडून तत्काळ सर्वेक्षण करून मंजूर करण्यात येईल; तसेच दरी तिथे बांध या अभिनव योजनेची अंमलबजावणी तत्काळ करण्याचेही वनमंत्री संजय राठोड यांनी यावेळी संकेत दिले. बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.