बुलडाणा : शिक्षकेत्तर कर्मचारी आकृतीबंध शासनाकडून मंजूर नसल्यामुळे राज्यातील हजारो अनुकंपा तत्वावरील चतुर्थ श्रेणी कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. कामे करुनही वेतन मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. उपेक्षा होत असल्याने कर्मचाऱ्यांनी सरकार दरबारी न्यायासाठी टाहो फोडला आहे. शासनाची परवानगी घेऊन शाळा, संस्थानी अनुकंपा तत्वावरील शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या चतुर्थ श्रेणी पदावर नियुक्त्या केल्या. कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करुनही घेतले. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सर्व कामे हे कर्मचारी करतात. परंतु त्यांना शासनाकडून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. हालाखिच्या परिस्थितीत कुटूंबाची जबाबदारी सांभाळणे अवघड झाले आहे. जिल्ह्यातील १० अनुकंप तत्वावरील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. त्यांच्या नियुक्त्यांना अनुकंप तत्वांतर्गत मान्यता मिळण्यासाठी तीन ते चार वर्षांपासून शिक्षणाधिकाऱ्यां कडे प्रस्ताव प्रलंबित आहेत. मात्र शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही. न्याय मिळाला नाही तर ६ आॅगस्ट पासून उपोषणाला बसण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
अशा आहेत मागण्या
अनुकंपा तत्वांतर्गत शिक्षकेत्तर कर्मचारी चतुर्थ श्रेणी पदावर सेवेत रुजू झाल्यापासून तत्काळ अनुकंपांतर्गत वैयक्तिक मान्यता प्रदान करुन वेतन सुरु करावे, तीन वर्षांपासून प्रलंबित राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचारी नवीन आकृतीबंध शासनाने तत्काळ जाहीर करावा. अथवा जुन्या आकृतीबंधानुसार शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या समस्या सोडविण्यासाठी व मान्यतेसाठी आदेश पारीत करावे, अनुकंप तत्वावर संबंधित शाळेत रुजू झाल्यापासून तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती द्यावी, अनुकंपांतर्गत नियुक्ती देण्याकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर असा भेदभाव थांबवावा.
प्रस्ताव प्रलंबित असलेले कर्मचारी
संस्थांनी अनुकंप तत्वांतर्गत नियुक्ती देऊनही शिक्षणाधिकाऱ्यांकडून नियुक्तीस मान्यता मिळाली नसलेल्या जिल्ह्यातील १० शिक्षकेत्तर कर्मचाºयांनी न्यायासाठी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बापुसाहेब देशमुख विद्यालय निवाणा येथील शिपाई वर्षा अवचार, जयज्ञान विद्यालय रुधाना येथील शिपाई प्रमिला राजनकर, जनता विद्यालय अंजनी खुर्द ता. लोणार येथील क़ लिपिक शिवकन्या खेडेकर, शिपाई सरस्वती कन्या विद्यालय जानेफळ येथील शिपाई पल्लवी तळेकर, एडेड विद्यालय बुलडाणा येथील शिपाई सुनील साळवे, उर्दू हायस्कूल बुलडाणा येथील शिपाई मो. अशरफ शे. असलम, मो. ते. संचेती विद्यालय देवधाबा ता. मलकापूर शिपाई प्रवीण बोरसे, मो. ते. संचेती विद्यालय देवधाबा ता. मलकापूर शिपाई विनोद कवळे, मो. ते. संचेती विद्यालय देवधाबा ता. मलकापूर लिपिक सुजितसिंह गौर, राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय पिंप्री गवळी ता. मोताळा शिपाई अश्विन पालवे यांचा समावेश आहे.