बुलडाणा : जिल्ह्यात प्रादेशिक व स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी बऱ्याच योजना जुन्या असून, त्यांना दुरुस्त करण्याची गरज आहे. तसेच जलजीवन मिशनअंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनाही प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. या मिशनअंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे काम पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या दालनात मंगळवारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मजिप्राचे कार्यकारी अभियंता व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलजीवन मिशनअंतर्गत कामे प्रस्तावित करताना लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल घेण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाले, त्यांना विश्वासात घेऊन कामे घ्यावी. तसेच जुन्या योजनांची रेट्रोफिटिंगची कामे करावी. जिल्हास्तरावरील योजनांची कामे पूर्ण करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात याव्यात. या मिशनअंतर्गत दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावयाचा आहे. त्यादृष्टीने योजनांचा आराखडा तयार करावा. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.