व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी आवश्यक
बुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून बंद असलेली दुकाने आता पुन्हा अनलॉकमुळे सुरू झाली आहेत. बाजारामध्ये गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे.
कांदा विक्रीमध्ये वाढ
बुलडाणा: पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करत आहेत. तसेच सद्यस्थिती शेतकऱ्यांजवळ उन्हाळी कांदा विक्रीचा एकमेव पर्याय आहे. खरीप हंगामाचा खर्च भागविण्यासाठी कांदा विक्रीमध्ये वाढ झाली आहे.
गावी आलेले मजूर वळले शेतीकडे
सुलतानपूर: कोरोनामुळे गावी गेलेले मजूर आता शेतीकामांवर परतू लागल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या कालावधीत अनेक मजूर गावी गेल्याने तर काही मजूर कामावर नसल्याने शेतीकामांचा खोळंबा झाला होता.
कोविड सेंटरला मदतीचा ओघ
बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे कोविड सेंटर्स ओस पडू लागली असली तरी सेवाभावी संस्थांकडून कोविड सेंटरला मदतीचा ओघ सुरूच आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, व्हीलचेअर, व्हेंटिलेटर्स अशी मदत केली जात आहे.
सायकल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात
लोणार : अनलॉकनंतर दुकाने सुरू झाल्याने लहान मुलांच्या सायकल दुरुस्तीची कामे कारागिरांकडे येऊ लागली आहेत. सध्या शाळा बंद असल्याने तसेच लॉकडाऊनमुळे मुलांना बाहेर येता येत नव्हते. आता पालकांनी सायकली दुरुस्तीसाठी काढल्या आहेत.
सर्क्यूलर रोडवरील खोदकामाने कोंडी
बुलडाणा: शहरातील सर्क्यूलर मार्गालगत खोदकाम सुरू असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने अडचण निर्माण होत आहे. काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
सलूनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले
देऊळगाव राजा: शहरातील काही युवकांनी बँकेचे कर्ज काढून सलूनचे दुकान थाटले आहे. मागील दीड वर्षापेक्षा अधिकच्या कालावधीत दुकाने उघडता आले नाही. या काळात बँकेकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते फेडण्यासाठी दमछाक आली. काही हप्ते थकले आहेत. घरचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी अनेकांच्या घरी जाऊन काम करावे लागले.
जनजीवन पूर्वपदावर
मेहकर: कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर आता नियम शिथिल करण्यात आल्याने साेमवारपासून बाजारात गर्दी उसळली आहे. नियम शिथिल होताच मेहकर शहरातील बाजारपेठ गजबजल्याचे चित्र दिसून येत आहे. कडक लॉकडाऊननंतर जनजीवन पूर्वपदावर आले आहे. लोणार वेस, आठवडी बाजार परिसरात सकाळपासूनच गर्दी होत आहे.
बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी
डोणगाव : यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर होणार असल्याने येथील बियाणे व खते विक्रीच्या दुकानामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने महाबीजच्या बियाण्यांसाठी अनुदान जाहीर केलेले आहे. मात्र बियाण्यांची टंचाई असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
कोचिंग क्लासेसला परवानगीची प्रतीक्षा
बुलडाणा: राज्य शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे. कोचिंग क्लासेस बंद असल्याने विद्यार्थ्यांसह कोचिंग क्लासेस चालक अडचणीत सापडले आहेत.