पूर्वी बुलडाणा शहराची ओळख थंड हवेचे ठिकाण म्हणून होती, परंतू आता या थंड हवेच्या ठिकाणीच तापमान वाढत आहे. विशेष म्हणजे स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या संकेतस्थळानेही बुधवारी जिल्ह्याचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंद झाल्याचे स्पष्ट केले. मंगळवार आणि बुधवारी आत्तापर्यंत जिल्ह्याचे तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविले गेले होते. बुधवारी मात्र या तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात ३० व ३१ मार्चला उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार, या दिवशी उन्हाच्या झळा नागरिकांनी अनुभवल्या. १ एप्रिलपासूनही तापमानात चांगलीच वाढ दिसून येत आहे.
मंगळवार, बुधवारचे तापमान
या आठवड्यामध्ये सर्वाधिक तापमान हे मंगळवारी हाेते. या दिवशी ३९ अंश सेल्सिअस तापमान होते. आता उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो.
असा राहील पंधरवडा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १० एप्रिलपर्यंत तापमान ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुलडाण्यात या आठवड्यातील तापमान सर्वाधिक आहे. सोमवार ३८ अंश सेल्सिअस, मंगळवार ३९ अंश, बुधवार ३८ अंश, गुरुवार ३७ अंश सेल्सिअस होते, तर शुक्रवारी ३७ अंश सेल्सिअस राहणार आहे.