- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणी २७ डिसेंबर पासून सुरू करण्यात आलेली आहे. मार्च २०२० मध्ये होणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाच्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ही कल व अभिक्षमता चाचणी मोबाईल व कॉम्प्युटरद्वारे पूर्ण करण्याची मुदत १८ जानेवारी २०२० पर्यंत ठरवून देण्यात आलेली आहे. पश्चिम विदर्भातील सुमारे सव्वालाखाच्यावर दहावीचे विद्यार्थी या परिक्षेत सहभागी झाले आहेत.महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पुढाकाराने व श्यामची आई फाउंडेशनच्या सहकायार्ने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ह्या चाचणीचे आयोजन केले जाते. राज्य शिक्षण मंडळाकडून दरवर्षी घेतल्या जाणाºया माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दिवशी विद्यार्थ्यांनी दिलेल्या कल व अभिक्षमता चाचणीचा अहवाल त्यांना देण्यात येतो. त्या अहवालानुसार विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्षेत्र, त्या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या संधी, त्या क्षेत्रासाठी आवश्यक असलेले उच्च -शिक्षण आणि ते उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संस्थांची माहिती इत्यादी बाबतीत विद्यार्थ्यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था बुलडाणा यांच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागाच्यावतीने मार्गदर्शन केले जाते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात विभाग प्रमुख डॉ . रवी जाधव, जिल्हा समुपदेशक अरविंद शिंगाडे व प्रवीण वायाळ हे या कक्षाची जबाबदारी सांभाळत आहेत. शालेय स्तरावर घेतल्या जाणाºया कल व अभिक्षमता चाचणीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यांसाठी प्रत्येक तालुकास्तरावर दोन मास्टर ट्रेनर्स तालुका समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.या कल व अभिक्षमता चाचणीमध्ये संबंधित मुख्याध्यापक- शिक्षकांनी इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करावे व त्यांचा भविष्यातील उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त करावा, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विजयकुमार शिंदे तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ .श्रीराम पानझाडे यांनी केले आहे .चाचणी आॅनलाईन व आॅफलाईन देण्याची सोय!मागील वषीर्पासून ही कल व अभिक्षमता चाचणी मोबाईलअॅप द्वारे विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेण्यात येत आहे . तथापि मोबाईल अॅप द्वारे चाचणी पूर्ण करून घेण्यास विविध अडचणी येत असल्यामुळे यावर्षी ही चाचणी मोबाईल अॅपसह संगणकाद्वारे आॅनलाईन व आॅफलाईन देण्याची सोय मंडळाने उपलब्ध करून दिलेली आहे . आवडी नुसार उच्च शिक्षणाच्या संधी!कल व अभिक्षमता चाचणीच्या माध्यमातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन केले जाते . या कल व अभिक्षमता चाचणी मध्ये एकूण सात क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये कृषी, वाणिज्य, कला व मानव्यविद्या, ललितकला, तांत्रिक, आरोग्य आणि गणवेषधारी सेवा या क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच या क्षेत्रांसाठी आवश्यक असणाºया भाषिक ,तार्किक, अवकाशीय व सांख्यिकीय क्षमतांशी संबंधित ज्ञान विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले जाते . बुलडाणा जिल्ह्यात चाचणीची यशस्वी अंमलबजावणीविभागीय शिक्षण मंडळ अमरावती येथे दिनांक २४ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सभेतील सूचनांप्रमाणे प्राचार्य विजयकुमार शिंदे व शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ . श्रीराम पानझाडे यांचे मार्गदर्शनात सर्व तालुक्यांमध्ये अभिक्षमता चाचणीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या कार्यशाळा घेण्यात आल्या. या कार्यशाळांमध्ये तालुका मास्टर ट्रेनर्स यांनी सर्व शिक्षकांना कल व अभिक्षमता चाचणी घेण्याविषयी तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले . तसेच जिल्हा कक्षाच्या वतीने कल व अभिक्षमता चाचणीच्या आवश्यकतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले . पश्चिम विदर्भातील सव्वालाखावर विद्यार्थी!इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कल व अभिक्षमता चाचणीसाठी बुलडाणा जिल्ह्यातील ३८ हजार अकोला जिल्ह्यातील २६ हजार आणि वाशिम जिल्ह्यातील २१ विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार असून अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, पश्चिम विदर्भातील सव्वालाखाच्यावर विद्यार्थी सहभागी होणार असल्याचा सुत्रांचा दावा आहे.