सिंदखेडराजा : येथील श्रीरामेश्वर मंदिराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. जीर्ण मंदिराची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. प्राचीन मंदिराच्या मूळ ढाचाला तडे गेले आहेत.
सिंदखेडराजा या शहराला ऐतिहासिक व आध्यत्मिक वारसा लाभलेला आहे. वनवास भोगत असताना प्रभू श्रीराम या भागातून गेल्याचे दाखले आहेत. राम वनवास गमन मार्ग शोधून काढणारे दिल्ली येथील राम अवतार शर्मा यांनी श्रीराम, सिंदखेडराजा येथील श्री रामेश्वर मंदिर असलेल्या स्थळी येऊन गेल्याचा उल्लेख केला आहे. त्यानंतर हेमाद्री राजाने भारतभर शिवमंदिरांची निर्मिती केली, त्यापैकी हे एक मंदिर आहे.
दरम्यान, आता ही प्राचीन वास्तू केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी म्हणून देण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाने आपल्या गॅझेमध्ये १९२५ पासून हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून समावेश करून घेतले आहे. २०१४ पर्यंत हे मंदिर औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात होते. मात्र आता ते नागपूर विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. परंतु केवळ कागदोपत्री घेवाणदेवाण या पलीकडे या मंदिरात कोणतीच डागडुजी करण्यात आलेली नाही. मध्यंतरी मंदिर परिसरातील दगडी फरशीचे काम झाले होते. परंतु मंदिराच्या मूळ ढाचाकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष आहे. आजमितीला मंदिराची दुरवस्था झाली असून मंदिराचे दगड झिजले आहेत. चबुतऱ्याखालील पाया ढासळत चालला असून मंदिर जमीनदोस्त होईल अशी शक्यता आहे.
आम्ही मंदिराच्या दुरुस्तीसाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहोत. झिजलेल्या दगडांना केमिकल क्लिनिंग करावी लागणार आहे.
हेमंत उखरे, वरिष्ठ संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग.
मंदिराची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागाने तत्काळ याची दाखल घेऊन मंदिराची दुरुस्ती करावी व मंदिर समितीला विश्वासात घेऊन येथील उत्सव, कार्यक्रम सुरू करावेत.
डॉ. सचिन महाजन, संचालक मंदिर समिती.
रामेश्वर मंदिर आमचे ग्राम दैवत आहे. या प्राचीन मंदिराचे जतन व्हावे. येथे राज्यभरातून भाविक, पर्यटक येतात. मंदिराची दुरवस्था पाहून तेही नाराजी व्यक्त करीत आहेत.
राम मेहेत्रे व्यवस्थापक, मंदिर समिती.