लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: सुमारे अडीच हजार वर्षापूर्वी प्रगत संस्कृती वास्तव्यास असलेल्या तथा सम्राट अशोक यांच्या कालखंडातील प्रसिद्ध असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील भोन येथील बौद्ध स्तुप व अवशेषांचे जतन करण्याच्या दृष्टीकोणातून आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यानुषंगाने जलसंपदा, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात येणार आहे.जिगाव प्रकल्पातंर्गत भोन हे गाव पुर्णत: बुडीत क्षेत्रात जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात अत्यंत महत्त्वाचे असे भोन हे स्थळ असल्याने येथील स्तुप परिसर, अडीच हजार वर्षापूर्वीचे कालवे, विटांचा त्या काळातील पुर्णा नदीवरील बंधारा, मानवी वस्ती तथा पुरास्थळांचे नव्याने उत्खनन करावे लागणार आहे. तसेच हे अवशेष शास्त्रीय पद्धतीने नोंदणीकृत करून त्याचा विस्तृत आराखडा तयार करावा लागणार आहे. तसेच या पुरावास्तू तथा अवशेषांचे टप्प्या टप्प्याने नियोजीत जागेवर मुळ स्थापत्याप्रमाणे स्थलांतरीत करावे लागणार आहे. त्यादृष्टीने आता प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.यासंदर्भाने अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरातत्व विभागाचे अधिकारी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेत सविस्तर आढावा घेतला. त्या बैठकीत बुलडाणा जिल्ह्यासह राज्याच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या पुराअवशेषांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रशासन कटीबद्ध असल्याचे डॉ. शिंगणे यांनी सांगितले.
उत्खननासाठी लागणार पाच कोटीमहाराष्ट्राचा अडीच हजार वर्षापूर्वीच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने भोनचे महत्त्व अनन्य सादारण आहे. त्यानुषंगाने ढोबळमानाने या ठिकाणी उत्खनन करण्यासाठी प्रारंभी पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचे नाशिक येथील पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक कार्यालयाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने आता पावले पडण्यास प्रारंभ झाला आहे. प्रारंभीक स्तरावर हा खर्च असला तरी प्रत्यक्ष उत्खनन सुरू झाल्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने सविस्तर आराखडाही तयार करण्यात येणार आहे.
जलसंपदा विभागही सकारात्मकभोन येथील हा प्राचिन इतिहास व तेथील बौद्ध स्तुप, पुरातन अवशेषांचे जतन व्हावे, यासाठी जलसंपदा विभाग सकारात्मक असून त्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. सोबतच भोन येथील पुरास्थळाचे उत्खनन त्वरित सुरू करण्यासाठी जलसंपदा विभाग लगोलग २५ लाख रुपयांचा निधीही उपलब्ध करण्याची तयारी दर्शवली आहे.