लोणार : स्थानिक तहसिल कार्यालयात विविध कामासाठी दलालांकडून जादा पैशाची मागणी होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसतो. याची दखल घेत परिसरात सुरु असलेले दलालांचे गोरखधंदे बंद करण्याच्या उद्देशाने तहसिलदारांनी तहसिल कार्यालयाच्या भिंतीवर विविध योजनाची माहिती आणि कामासाठी आकारल्या जाणार्या शासकीय शुल्काबाबतचे दरपत्रक लावले आहे. यामुळे दलालांना चाप बसणार आहे. तहसिल कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागातील योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच नविन शिधापत्रिकासाठी तालुक्यात दलालांची मोठी संख्या आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेवून हे दलाल विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ५00 रुपयांपासून लाभार्थ्यांकडे मागणी करतात. तसेच तहसिलमधील पुरवठा विभागातही एपीएल, बीपीएल, शुभ्र शिधापत्रिकेसाठी २00 ते ५00 रुपये आकारण्यात येतात. त्याच्याच दुय्यम प्रतीसाठी १00 ते ३00 रुपये घेतल्याशिवाय कामच होत नाही. ६ महिन्यापूर्वी तहसिलमध्ये सीसीटीव्ही बसविल्यामुळे दलालांच्या हरकती थोड्याफार कमी झाल्या होत्या. परंतु आता या दलालांनी नविन शक्कल सुरु केली असून, तहसिलच्या आवाराबाहेरच पैसे घेवून नागरिकांचे काम करुन दिले जाते. अधिकारी वर्गही दलालांमार्फत आलेल्या व्यक्तीस प्राधान्य देऊन झटपट काम करुन देतात. यामुळे इतरांना मोठा त्रास सहन करावा लागतो. याची दखल घेवून तहसिलदार मनिष गायकवाड यांनी विविध कामासाठी आकारल्या जाणार्या शासकीय शुल्काचे दरपत्रक भिंतीवर लावले आहे. त्यामुळे दलालांना चाप बसणार आहे.
लोणार तहसील परिसरातील दलालांना चाप
By admin | Published: October 02, 2014 12:32 AM