बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असल्याने यात्रा महाेत्सवांना प्रशासनाने बंदी घातली आहे. बुलडाणा तालुक्यातील सैलानी बाबांची यात्राही रद्द करण्यात आली आहे. यात्रा महाेत्सवानिमित्त गर्दी हाेउ नये यासासाठी दर्गा परिसरात २५ मार्चपासूनच पाेलीस बंदाेबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच येत्या २८ मार्च राेजी दर्गा परिसरात हाेणारी नारळांची हाेळी आणि २ एप्रिल राेही निघणारा बाबांचा संदल रद्द करण्यात आला आहे.
कोविंडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सैलानी बाबांची यात्रा प्रशासनाने रद्द केली आहे. सैलानी बाबांच्या दर्गा परिसरामध्ये सैलानी यात्रा काळात भाविकांनी गर्दी करु नये, यासाठी बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया पोलीस उपाधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकते, रायपूर पोलीस स्टेशन ठाणेदार सुभाष दुधाळ, पीएसआय योगेंद्र मोरे रायपूर पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. पिंपळगाव सराई पॉईंट, ढासाळवाडी पॉईंट ,भारत फाटा जीरा पॉईंट, वाघजाळी दर्गा धाड ,भडगाव पॉईंट या सर्व पॉईंटवर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या कॅम्प उभे करण्यात आले आहे. १५ पोलीस अधिकारी,३० महिला कर्मचारी, १२५ पोलीस कर्मचारी, ४० ट्राफिक कर्मचारी, आरसीपी पथक असा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. सैलानी बाबाच्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह भारताच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे भाविकांना सैलानी यात्रा परिसरात रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.