संग्रामपूर (बुलढाणा) : ठाणे पोलिसांनी घातक हत्यारांसह रंगेहाथ पकडलेल्या मध्य प्रदेशातील त्या दोन्ही आरोपींच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. १० जून रोजी दोन आरोपींची पोलिस कोठडी संपुष्टात येणार होती. तर, तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिस घेत आहेत.
आरोपींकडून ठाणे पोलिसांनी तब्बल १७ देशी पिस्टल, ३१ मॅग्झीन व १२ जिवंत काडतुसे जप्त केलेली आहेत. मध्य प्रदेशातील रमेश मिसरीया किराडे (२५), मुन्ना अमाशा अलवे (३४) रा. पाचोरी ता. दातपाडी, जि. बऱ्हाणपूर या आरोपींकडून १ जूनला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मालमत्ता गुन्हे शोध पथकाने ३ देशी पिस्टल, ६ मॅग्झीन, ४ जिवंत काडतुसांसह पकडले होते. दोघांविरुद्ध राबोडी पोलिस ठाण्यात कलम ३,७,२५ भादंविसह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस चौकशी दरम्यान विक्रीसाठी आणलेली घातक हत्यारे लपवून ठेवल्याची कबुली आरोपींनी दिली. ठाणे पोलिसांनी तत्काळ संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा स्टेशन गाठून आरोपीच्या कबुली प्रमाणे कारवाई केली. ३ जून रोजी सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीतील टुनकी, वसाली परिसरातील गावात नातेवाइकांच्या घरात लपवून ठेवलेले १४ देशी पिस्टल, २५ मॅग्झीन, ८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आरोपीने नातेवाइकांना माहिती न पडू देता विक्रीसाठी हे अग्निशस्त्र घरात लपविले होते.
ठाणे पोलिसांच्या या कारवाईने स्थानिक पोलिसांचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. १० जून रोजी कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता कोठडीत ४ दिवसांनी वाढ करण्यात आली. घातक हत्यार तस्करीसंदर्भात एका आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणे पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान, मध्य प्रदेशातील शस्त्र माफियांना जेरबंद करण्याचे आव्हान ठाणे पोलिसांसमोर आहे.