बुलडाणा : नगर पालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेकडे दमदार असे संख्याबळ असतानाही शिवसेने उमेदवार दिला नाही. सेनेच्या या कृतीवर शिवसेना शहरप्रमुख मुन्ना बेंडवाल यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणी आमदार विजयराज शिंदे यांनी राजकीय तडजोड केली असा जाहिर आरोप त्यांनी केला होता. या पृष्ठभूमीवर खासदार प्रतापराव जाधव व जिल्हाप्रमुख धिरज लिंगाडे यांनी सेनेचे नगरसेवक मतदान प्रक्रीयेत सहभागी होणार नाही असे पत्रक शिवसेना कार्याध्यक्षांच्या आदेशाने काढल्याने राजकारण चांगलेच तापले आहे. बुलडाणा पालीकेत २७ सदस्य असुन शिवसेनेचे ९ , भाजपाचा १, अपक्ष २, काँग्रेस ४ असे संख्याबळ असुन राष्ट्रवादीच्या ११ सदस्यांपैकी २ मनसेत गेले आहेत. गेल्यावेळी शिवसेनेने काँग्रेसला पाठींबा देत सत्ता हस्तगत करून उपाध्यक्षपद स्विकारले होते. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीने सर्व अभ्रद युती मोडून काढल्याने शिवसेनेला सत्ता स्थापनेचा नवा पर्याय सहज शक्य होता. सेना,भाजपा, अपक्ष अशी मोट बांधुन सत्तेचा प्रयत्न करता आला असता मात्र आ.शिंदे यांनी उमेदवारी अर्जच दाखल करण्याचे टाळले. आ.शिंदे यांची ही खेळी शिवसेनेतील वाद चव्हाटयावर आणणारी ठरली असुन सेनेची राष्ट्रवादीसोबत गुप्त तडजोड झाली का? अशी शंका थेट शहरप्रमुख बेंडवाल यांनीच उपस्थित केल्याने त्याची दखल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, सचिव अनिल देसाई यांनी घेतली आहे. या नुसार खासदार जाधव व जिल्हाप्रमुख लिंगाडे यांनी पत्रक काढून सेनेचे ९ नगरसेवक मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाहीत असे आदेश काढले असुन कायदेशीर करावाईचाही इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी झाली असुन तुकाराम अंभारे पाटील व मो.सज्जाद हे दोघेही निवडणुकीत कायम आहेत. या पृष्ठभूमीवर शिवसेनेचा निर्णय हा पालीकेतील राजकारणाला नवा रंग देणारा ठरला आहे.
** खामगाव : 'शविआ'नेही कसली कंबर
खामगाव: नगर पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शहर विकास आघाडीनेही शर्थीचे प्रयत्न चालविले असुन राष्ट्रवादीचे नगरसेवक वैभव डवरे यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहर विकास आघाडीच्या अशा प्रयत्नांमुळे खामगाव नगर पालिकेत सत्ता स्थापनेसाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. शहर विकास आघाडीत असलेल्या वैभव डवरे यांनी पक्षाच्या व्हीप नुसार काँग्रेसचा हात पकडला आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा सत्ता स्थापन करण्याचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. दरम्यान, नगर पालिकेत भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप या पक्षाच्या नगरसेवकांनी स्वत:हून नगर पालिकेत सत्ता स्थापन करताना जिल्हाधिकार्यांकडे शहर विकास आघाडी नावाने पक्षविरहित आघाडी म्हणून रितसर नोंदणीही केली. त्यामुळे उपरोक्त पक्षाच्या नगरसेवकांची आघाडी हा एक स्वतंत्र पक्ष म्हणून नगर पालिकेत अस्तित्वात आला. त्यामुळे या आघाडीच्या व्हीपलाही राजकीय पक्षाच्या एवढेच महत्व असल्याचे शहर विकास आघाडीचे नेते सांगतात.मात्र आता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना राष्ट्रवादी काँग्रेसने व्हीप देवून काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान करायला सांगितले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीेचे डवरे हे राष्ट्रवादीचा व्हीप स्विकारून काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने मतदान करतील की आघाडी सोबत राहतील याबाबत शहरात राजकीय चर्चेला उत आला आहे.