बुलढाणा : जवळपास १७ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे सुमारे ५३ लाख रुपयांचे उपदान देण्यास टाळाटाळ केल्यामुळे बुलढाणा येथील राज्य परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यालयास ३० नोव्हेेंबर रोजी सायंकाळी सील लावण्यात आले. सेवानिवृत्तांच्या उपदानाची रक्कम देण्यास विलंब झाल्यास एसटी महामंडळाच्या बुलढाणा विभागाच्या अखत्यारीतील जमिनीची लिलाव प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.
संबंधित सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची उपदानाची रक्कम २५ सप्टेंबर रोजी अदा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र ही बाब एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून गंभीरतेने घेण्यात आली नाही. यामध्ये जवळपास दोन महिन्याचा कालावधी उलटून गेला. त्यामुळे बुलढाणा तहसिल कार्यालयातील अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालय सील करण्याची प्रक्रिया ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी पार पडाली. या कारवाईमध्ये बुलढाणा तहसिल कार्यालयातील नायब तहसिलदार पवार, मंडळ अधिकारी विजय टेकाळे, तलाठी गोपालसिंग राजपूत आणि अतूल झगरे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
दुसरीकडे या प्रकरणी तातडीने बुलढाणा विभाग नियंत्रक कार्यालयाकडून तातडीने पावले उचलण्यात येऊन संबंधित सेवानिवृत्तांच्या उपदानाच्या रकमेचा धनादेश देण्यात आला असल्याची माहिती आहे. यासंदर्भात विभाग नियंत्रक अशोककुमार वाडीभस्मे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.