आमदार श्वेता महाले यांनी १६ सप्टेंबर रोजी मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेत उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले आहे. यामध्ये प्रामुख्याने अत्याचाराचे प्रकरण गंभीर व संवेदनशील असतानाही अद्यापही गुन्हेगाराला अटक झालेली नसल्याने जनतेमध्ये तीव्र असंतोष असल्याचे स्पष्ट करून या गुन्ह्यातील आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. तसेच पत्रकारास लोटपोट व मारहाण प्रकरातील दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तर मुंबई, पुणे, अमरावती येथील घटनांतील आरोपींसह राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारातील दोषी गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी प्रस्तावित शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीने करण्याची सुद्धा मागणी त्यांनी यावेळी केली आहे.
नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा आणण्याचे आश्वासन !
महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना पाहता महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा अंमलात आणण्याची घोषणा केली. त्यासाठी विधिमंडळ समितीसुद्धा गठित झाली. अनेक बैठका होऊनही अजून शक्ती कायद्याला अंतिम स्वरूप देता आले नाही. दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस कुणी करू नये यासाठी कायदा कठोर असावा. त्याची जरब असावी. यासाठी कायद्यात तशा तरतुदी करून कायदा तातडीने लागू व्हावा, अशी मागणी यावेळी आ. महाले यांनी केली. येत्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये शक्ती कायदा आणण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी आ. महाले यांना दिले आहे.