लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद: कारमधून मांडूळ साप घेऊन जात असलेल्या वाडी ता. खामगाव येथील दोघांना जळगाव जामोद पोलिसांनी पकडल्याची घटना मंगळवार २४ ऑक्टोबर रोजी घडली. जळगाव पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शोध घेतला असता आरोपी संतोष सुगदेव चांदुरकर (वय ४२ वर्षे) आणि शुभम संतोष चांदुरकर (वय २२ वर्षे) रा. जय मातादी नगर, वाडी, ता. खामगाव यांच्याकडे कार क्र.एम.एच.0४-डीबी ३३५ या चारचाकी गाडीमध्ये एका बरणीत मांडूळ साप आढळून आला. त्यामुळे जळगाव पोलिसांनी याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव यांना पत्र देऊन कारवाई करण्याबाबत कळविले. यावरून वन विभागाचे अधिकारी आंग्रे, वाहनचालक गजानन कुटे, वनरक्षक उंबरहंडे, नाजुकराव भास्कर तसेच पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संजय भंडारी व त्यांचे सहकारी यांच्या सहकार्याने आरोपींना ताब्यात घेण्यात आले व भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४, ४८ अ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर दोन्ही आरोपींना विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय जळगाव जामोद येथे हजर केले असता त्यांना २६ ऑक्टोबरपर्यंत एफसीआर सुनावण्यात आला आहे. सदर प्रकरणी पुढील तपास उपवनसंरक्षक बुलडाणा भगत तसेच सहायक वन संरक्षक व प्राधिकृत अधिकारी, बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नवनाथ कांबळे हे करीत आहेत.
सापांच्या तस्करीत वाढ झाल्याचा संशय या घटनेमुळे जिल्हय़ात सापांच्या तस्करीत वाढ झाल्याचा संशय बळावला आहे. याअगोदरसुद्धा मांडूळ व अन्य जातीच्या सापांची तस्करी करताना काही जणांना पकडण्यात आलेले आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस प्रशासनासह वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.