बुलडाणा - भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाच्या वृत्तानंतर देशभरात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुपारी 12 वाजून 07 मिनिटांनी जेटली यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे वृत कळताच राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येऊ लागला. भाजपाच्या नेत्यांनी आपले नियोजित दौरे तात्काळ रद्द केले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अबुधाबीवरुन फोन करत जेटलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. विशेष म्हणजे जेटलींचे सुपुत्र रोहन यांनी मोदींना त्यांचा नियोजित दौरा पूर्ण करण्याचे बजावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या वैयक्तिक ट्विटच्या माध्यमातून जेटलींना श्रद्धांजली वाहिली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहचली होती. तेथून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार, जेटलींना भुसावळ येथे श्रद्धांजली अर्पण करुन मुख्यमंत्र्यांनी खामगावच्या दिशेने आपली यात्रा सुरू केली. खामगाव येथे पोहोचल्यानंतर फडणवीस यांनी तेथील जमलेल्या जनसुमदायाला संबोधित केले.
खामगावमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक फडणवीस यांची वाट पाहात होते. येथील व्यासपीठावर गेल्यानंतर फडणवीस यांनी, सर्वप्रथम जेटलींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, आपल्या भाषणाला सुरुवात केली. मात्र, येथील भाषणात फडणवीस यांनी कुठल्याही राजकीय मुद्द्याला किंवा विरोधकांवरांना उद्देशून भाषण केले नाही. केवळ, जेटलींबद्दल, जेटलींच्या कार्यकर्तृत्वाबद्दल आणि जेटलींच्या व्यक्तीमत्वाबद्दल फडणवीस यांनी भाषण केले. तसेच, या भाषणानंतर कुठलिही नारेबाजी देण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली होती. एक संवेदनशील नागरिक, कार्यकर्ता म्हणून आपण आपल्या नेत्याच्या निधनाने झालेली हानी, लक्षात घेऊन आपल्या संवेदना नेत्याप्रति व्यक्त केल्या पाहिजेत, असे फडणवीस यांनी म्हटले.
खामगाव येथील भाषणात बोलताना फडणवीस म्हणाले की, येथे जमलेल्या लोकांना भेटणं, त्यांना सद्यपरिस्थितीबद्दल अवगत करणं आणि जेटलींना श्रद्धांजली अर्पण करणं गरजेचं असल्यामुळे मी यात्रा जागेवरच स्थगित न करता खामगावात पोहोचलो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, येथील भाषणाच्या शेवटी त्यांनी आपण आपली महाजनादेश यात्रा दोन दिवसांकरिता रद्द करत असल्याचं सांगितलं. जेटलींच्या अंत्यसंस्कारानंतरच यात्रेच्या पुढील कार्यक्रमास सुरूवात होईल, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, जेटलींच्या निधनानंतरही फडणवीस यांची महाजनादेश यात्रा खामगावात पोहोचली, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र, फडणवीस यांनी तेथील उपस्थित, जमलेल्या नागरिकांच्या भावनांची कदर करत खामगावात येऊन, जेटलींना श्रद्धांजली वाहून आपल्या यात्रेचा समारोप केला.
पाहा, खामगाव येथील सभेचा व्हिडीओ -