सिंदखेडराजा : जळगाव आणि पिंपळगाव एक नदी आडवी असलेली ही दोन गावे. नदीवर पूल व्हावा, यासाठी अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. दोन्ही ग्रामस्थांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे; परंतु झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जाग कशी येणार, असा प्रश्न आहे. त्याच या नदीपात्रातून जीव धाेक्यात घालून विद्यार्थी शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जात आहेत.
जळगाव हे सिंदखेडराजा तालुक्यातील दोन ते अडीच हजार लोकवस्तीचे, तर पिंपळगाव हे देऊळगावराजा तालुक्यातील त्याच लोकवस्तीचे गाव. या दोन्ही गावांतून आमना नदीचा प्रवाह जातो. जळगावमधील शेकडो विद्यार्थी पिंपळगाव येथील शाळेत शिक्षण घेतात, तर दोन्ही गावांतील ग्रामस्थ व्यवहार व नातेसंबंध असल्याने नेहमीच ये-जा करतात. एकूणच काय तर जुळी असलेल्या या गावांना आमना नदीचे पात्र ओलांडून जावे यावे लागते. हा अनेक वर्षांचा शिरस्ता अनेक पिढ्यांनी अनुभवला आहे. यात शालेय विद्यार्थ्यांची मोठीच अडचण होते.
नदीवर पूल असावा जेणेकरून विद्यार्थी आणि वृद्ध ग्रामस्थांना येथून येणे-जाणे करणे सोईचे जाणार आहे. यासाठी गेल्या सात-आठ वर्षांपासून दोन्ही गावचे जाणते लोक सरकारदरबारी प्रयत्न करीत आहेत. निवेदन झाले, आंदोलन झाले; मात्र प्रशासनाला हा विषय अजूनही गांभीर्याने घेता आला नाही. याचे परिणाम विद्यार्थी आणि ग्रामस्थांना विशेष करून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
नदीत बसून आंदाेलन करण्याचा इशारा
जळगाव, पिंपळगाव या दोन्ही गावांना जोडणारा नदीवरील पूल त्वरित मंजूर करावा, यासाठी निवेदन देणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सचिन मांटे यांनी तहसीलदार यांनी नुकतेच निवेदन दिले आहे, तसेच मागणी मान्य न झाल्यास नदीत बसून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मांटे यांनी याबाबत मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कळविले आहे.
पाठपुरावा करूनही यश नाही
आम्ही यापूर्वी देखील अनेकवेळा प्रशासनाला निवेदन दिले आहे. डॉ. सुनील कायंदे यांनी मागील काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना येथील परिस्थितीबाबत माहिती दिली होती. अनेकवेळा पाठपुरावा करून देखील आमची पुलाची मागणी पूर्ण होत नसल्याने आम्ही ग्रमस्थांसह नदीत बसून आंदोलन करण्याचा इशारा दिल्याचे जळगाव येथील सरपंच रामकिसन नागरे यांनी सांगितले.