लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी जिलह्यातील आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिला कर्मचारी गेल्या काही दिवसापासून संपावर गेल्या आहेत. दरम्यान प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबीत असलेल्या मागण्यांची पुर्तता करण्यात यावी, अशी मागणी करत मेहकर येथील पंचायत समितीमध्ये आशा वर्कर्स व गटप्रवर्तक महिलांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांना घेराव घातला.गेल्या आठ दिवसापासून आशा व गटप्रवर्तक आपल्याला किमान वेतन, कर्मचारी दर्जा मिळावा, आरोग्य विमा, कोविड भत्ता, ३०० रुपये रोज द्यावा आणि आरोग्य सेवेतील नवीन भरतीमध्ये ५० टक्के आरक्षण मिळावे या मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. आठ दिवस उलटून गेल्यानंतरही शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सीटूच्या अंतर्गत तालुकापातळीवर विविध स्वरुपाचे आंदोलन करत अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देत आहेत. दरम्यान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबले हे मेहकर येथे कामानिमित्त गेले असता तेथे आशा वर्कर्सनी त्यांना घेराव घातला. वेतनासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा सिटूच्या वतीने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी सीटूचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांनी दिला आहे. यावेळी सीमा सुरूशे, सुलोचना गाडेकर, सुनीता शिराळे, स्वाती आहेर, शारदा आंभोरे, मनिषा आंभोरे, ज्योती रहाटे, शारदा गाडेकर यांच्यासह अन्य या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कांबळे यांनी यावेळी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
मेहकर येथे आशा वर्कर्सचा डीएचओंना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:16 AM