अकोला : आंतरराष्ट्रीय महिला दिवसाचे औचित्य साधून, महिलांवरील अत्याचाराचा विरोध करीत, महिलांना समान काम समान वेतन देण्यासह इतर मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.महिलांना समान काम-समान वेतन देण्यात यावे, महिलांच्या बिनपगारी घरगुती कामाचा सम्मान करण्यात यावा, महिला व मुलांवरील अत्याचार आणि हिंसा बंद करण्यात याव्या, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा करण्यात यावी, घटनाविरोधी सीएए, एनआरसी, एनपीआर रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटना अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. या धरणे आंदोलनात संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजन गावंडे, रूपाली धांडे, संतोष चिपडे, संध्या पाटील, मीना वानखडे, ज्योती बेलोकार, कालिंदा देशमुख, मीना गेबड यांच्यासह आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्ह्यातील महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.