- अनिल उंबरकार लोकमत न्यूज नेटवर्क शेगाव : ‘यंदाही महामारीने चुकलीया वारी, येऊ शकलो नाही तुझ्या दारी, दुःख वाटते मनात, ओढ लागे जिव्हारी, एकच मागणे मागतो, तुझ्या चरणी हा वारकरी, पुन्हा सुखाचे दिवस येऊ दे घरोघरी’, अशी विनवणी करत आषाढी एकादशीच्या पर्वावर गावोगावीचे हजारो वारकरी व भक्तांनी श्री चरणी मंदिरा बोहरूनच माथा टेकवला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री गजानन महाराज मंदिर बंद आहे. मात्र, तरीही श्रींच्या मंदिराच्या बंद प्रवेशद्वाराजवळ व कळसदर्शन घेऊन आषाढीची वारी अनेकांनी पूर्ण केली. कोरोनामुळे गत दीड वर्षापासून संतनगरीत भजनी दिंड्या व टाळ- मृदंगाचा गजर ऐकावयास मिळत नाही. संतनगरीत लाखो भाविक भक्तांची मांदियाळी राहायची. मागील वर्षी व यंदा भजनी दिंड्यांची वर्दळ शासनाच्या निर्बंधांमुळे दिसली नाही. मात्र दोन वर्षापूर्वीच्या आठवणी या निमित्ताने ताज्या झाल्या होत्या.
दुरूनच कळसाचे दर्शन
कोरोनाच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण देवस्थाने बंद आहेत. श्रीचे मंदिर ही बंदच आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या दिवशी श्री संस्थानच्या वतीने श्रींच्या मंदिरात पारंपारिक पद्धतीने अंतर्गतस्तरावरच पुजा केली. वारी चूक नये म्हणून अनेकांनी शेगाात येत दुरूनच कळसाचे दर्शन घेतले.