- अजहर अली
संग्रामपूर : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त विदर्भ दौ-यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपला नियोजित दौरा अर्ध्यावर सोडावा लागला. संग्रामपूर तालुक्यातील श्री क्षेत्र काटेल येथे दर्शनासाठी जात असताना चव्हाण यांची प्रकृती बिघडली. या आकस्मिक घटनेमुळे क्षणभर सर्वच घाबरले होते.राज्यातील भाजप सरकारच्या शेतकरी आणि सर्व सामान्य विरोधी धोरणाच्या निषेधार्थ ‘महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कासाठी ’ पश्चिम विदर्भातील अकोट, वरवट-बकाल आणि खामगाव येथे जनसंघर्ष यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेदरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अकोट येथील दौरा आटोपून, जेवण केल्यानंतर शनिवारी दुपारी सोनाळा मार्गे संग्रामपूरकडे निघाले. वाटेत श्री क्षेत्र काटेल येथील संत गुलाबबाबा संस्थान येथे दर्शनासाठी जात असताना, त्यांचे अचानक पोट बिघडले. तसेच ताप चढला. तसेच घरघरल्यासारखे वाटू लागले. त्यामुळे पुढील नियोजित कार्यक्रम रद्द करून त्यांनी काटेल येथे विश्राम केला. यावेळी त्यांच्यावर डॉ. दलाल, डॉ. संजय कोलते, डॉ.वाकेकर, डॉ. पुरूषोत्तम दातकर यांनी त्यांच्यावर उपचार केला.
भोवळ आल्याची चर्चा!केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभावेळी भोवळ आल्याचा प्रकार ताजा असतानाच, शनिवारी काटेल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली. तर माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भोवळ आल्याची चर्चा परिसरात होती.
गुलाबबाबांवर श्रध्दा!काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे वडील स्व. शंकरराव चव्हाण काटेल येथील संत गुलाबबाबांचे भक्त होते. त्यामुळेच १९८०-८२ च्या कालावधीत ते काटेल येथे आले होते. त्यानंतर शनिवारी अशोक चव्हाण काटेल येथे दर्शनासाठी आले होते. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने, त्यांनी आपला पुढील दौरा रद्द केला. काटेल येथून रात्री ८:३० वाजता दरम्यान, ते शेगावकडे निघाले होते. शेगाव येथून औरंगाबाद येथे जाणार असल्याचे समजते.
काटेल येथे अशोकराव चव्हाणांचे पोट बिघडले होते. तसेच त्यांना तापही चढला होता. सततच्या प्रवासामुळे ही घटना घडली असली तरी, आता ते सुखरूप आहेत.- डॉ. एस.के.दलाल