सिंदखेडराजा : विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी आंदाेलन सुरू केले आहे. आशांचे प्रश्न साेडविण्याची मागणी मनसेच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूदर कमी करण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली आहे, त्या कामांमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. या आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरणअंतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे, आदी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच याव्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमून दिलेली ७२ पेक्षा जास्त कामे करावी लागतात. आशा सेविकांना सर्व्हेच्या कामाचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तकांना वरिष्ठांना सादर करावा लागतो. वीस गावांना भेटी देण्याचे गटप्रवर्तकांचे मूळ काम आहे. परंतु त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र व क्वारंटाईन कॅम्पमध्ये ८ ते ९ तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडत असून, त्या तुलनेत मोबदला मात्र फार कमी आहे. त्यांना योग्य ते मानधन देण्यात यावे व त्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक कर्मचारी यांच्यावतीने सिंदखेड राजा तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली. यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, मनसे तालुकाध्यक्ष नीलेश देवरे, अभिजित देशमुख, भागवत राजे जाधव, पवन राजे जाधव, घनशाम केळकर, अंकुश चव्हाण व मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या़