मेहकर : मागेल त्याला शेततळे ही मुख्यमंत्री शाश्वत योजना म्हणून मोठा प्रचार केला जातो आहे. शेती सिंचनाच्या दृष्टीने ती महत्वाकांक्षी आणि उपयोगी असली, तरी मेहकर तालुक्यातील २३९ तळ्यांची मागणी नोंदवलेल्या शेतकऱ्यांपैकी फक्त केवळ २१ अर्ज मंजूर झाले आहेत. २१८ रद्द झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
तालुक्यातील हिवरा आश्रम, अंत्री देशमुख, सोनाटी या पट्ट्यातील जमिनी काळ्या मातीची खोली जास्त असलेल्या आहेत. पैनगंगा नदीकाठचा हा भूभाग सिंचनदृष्ट्या चांगला आहे. इतर भागात मुरूम कमी खोलीवर आहे. त्यामुळे शेततळ्याचे प्रमाण कमी आहे. सिंचन वाढवण्यासाठी सरकारी खर्चाने शेततळे घ्या, असे आवाहन करून योजनेचा गवगवा खूप झाला. तालुक्यातून २३९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून शेततळ्यासाठी मागणी केली. पण आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्याने २०६ अर्ज कृषी खात्याने फेटाळले. १२ शेतकऱ्यांनी स्वतः अर्ज मागे घेतले. २१ अर्ज अनुदानप्राप्त ठरले. खरे तर सिंचनाचे प्रमाण तालुक्यात अतिशय कमी आहे. उत्पन्न वाढीसाठी फळबाग, भाजीपाला व कमी कालावधीत येणारी पिके, जोडधंदा म्हणून मच्छिपालन करण्यासाठी शेततळे हा उत्तम पर्याय आहे. कागदपत्रांची विहित मुदतीत पूर्तता करून घेण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जागरूकता व पाठपुरावा वाढवणे गरजेचे आहे.
कसे मिळते अनुदान
सातबारा, नमुना ८ अ, आधारकार्ड, पॅनकार्ड यासह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावा. १५ बाय १५ चौरस मीटरच्या शेततळ्यासाठी २१ हजार रुपये, तर २० बाय २५ चौ.मी.साठी ५४ हजार रुपये आणि ३० बाय ३० आकारासाठी ७५ हजार रुपये पर्यंत अनुदान मिळते. योजना वर्षभर सुरू आहे.
शेतकरी या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज पाठवितात. त्यांना पूर्ण माहिती कृषी विभाग देतो. कोणाचे कोणते दस्तऐवज अपलोड केलेले नाहीत, हे कळत नाही. याबाबत अधिक जागरुकता वाढवली जाईल. योजना शेतकरी हिताची असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.- उध्दव एस. काळे, कृषी अधिकारी, मेहकर.