बोराखेडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ विष्णू माधवराव जायभाये (४०) यांनी २४ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. वरिष्ठ तंत्रज्ञ विष्णू माधवराव जायभाये (४०) व त्यांचे सहकारी कर्मचारी अनिल शंकर ढोले आणि सागर प्रल्हाद मोरे हे तिघे कर्मचारी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार महावितरणची थकबाकी वसुलीचे काम करत होते. दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास मोताळा शहरातील आदर्शनगरमधील वीज ग्राहक मंगेश सुधाकर ठोंबरे यांना वीज बिल भरण्यास त्यांनी सांगितले असता ठोंबरे यांनी वीज खंडित करा, असे सांगितले. त्यामुळे ठोंबरेंचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे मंगेश ठोंबरे यांचा भाऊ अक्षय सुधाकर ठोंबरे याने विष्णू जायभाये व अनिल ढोले यांना मारहाण करत शिवीगाळ केली. सोबतच त्यांच्याकडील थकबाकीची यादीही फाडली. या व्यतिरिक्त घरातून तलवार आणत त्यांच्यावर उगारली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तथा जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जायभाये यांनी दिलेल्या तक्रारीवरून बोराखेडी पोलिसांनी अक्षय सुधाकर ठोंबरे (रा. आदर्शनगर, मोताळा) याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रोकडे करीत आहेत.
महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण, एका विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:48 AM