- अनिल गवईखामगाव - दारूच्या नशेत तर्र असलेल्या एका आरोपीने हातातील काठीने अंगणात झोपलेल्या युवकाच्या डोक्यात तसेच सर्वांगावर हल्ला चढविला. त्याचवेळी एकापाठोपाठ त्याने तब्बल आठ जणांना हातातील काठीने दोन्ही हाताने प्रहार करीत जखमी केले. शुक्रवारी पहाटे चार वाजताच्या दरम्यान, खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथे ही घटना घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, यातील गंभीर जखमी युवकाला अत्यवस्थ अवस्थेत नागपूर येथे हलविण्यात आले. काही जखमींवर खामगाव येथील रूग्णालयात तर काहींना अकोला येथे हलविण्यात आल्याचे समजते.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सविस्तर असे की, खामगाव तालुक्यातील भालेगाव बाजार येथे शुक्रवारी पहाटे गावातीलच गणेश सिताराम दिवनाले ३६ हा हातात काठी घेऊन फिरत होता. दरम्यान, गाढ झोपेत असलेल्या संतोष संभारे यांच्या डोक्यावर दिवनाले याने दोन्ही हाताने काठीने जाेरदार प्रहार केला. यावेळी आवाज झाल्याने बाजूलाच झोपलेले सदाशिव एकडे, तुळसाबाई एकडे यांच्यावरही आरोपीने काठीने हल्ला चढविला. त्याचवेळी शेजारी राहणार्या इतर चार ते पाच जणांना काहीही एक कारण नसताना हल्ला करून जखमी केल्याचा आरोप अर्चना रमेश एकडे यांनी पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून पिंपळगाव राजा पोलीसांनी आरोपी गणेश दिवनाले याच्या विरोधात भादंवि कलम ३०७, ३२५, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली. आता गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
अशी आहेत जखमींची नावेसंतोष शत्रुघ्न संबारे (२२), सदाशिव देवराव एकडे( ६६), तुळसाबाई सदाशिव एकडे (६२), सागर राजेश हुरसाड (२६), संजय प्रल्हाद हुरसाड (४८), सुनिता राजेश हुरसाड (४७), अनुराधा प्रकाश कोल्हे (२३) .चौकट...
एकाला नागपूरला हलविलेलाठी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष संबारे याला सुरूवातीला खामगाव येथे आणि त्यानंतर नागपूर येथे हलविण्यात आले. या युवकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे समजते.
उपविभागीय अधिकार्यांची भेटया घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली. परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी निरिक्षक सतीश आडे अाणि पथक घटनास्थळी दाखल झाले होते.