लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: प्रेमविवाह करून परतल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये बयाण नोंदवून परत येत असताना एका युवकावर १२-१३ जणांनी प्राणघातक हल्ला केला. युवकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनेनंतर तातडीने शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध सुरू केल्याचे समजते.
सती फैलातील रहिवासी असलेला अमन ऊर्फ रघू विजय तिवारी हा २६ वर्षीय युवक जनुना येथील एका खासगी कंपनीत पर्यवेक्षक आहे. तीन महिन्यांपूर्वीपासून शहरातील एका युवतीसोबत त्याने पळून जात प्रेमविवाह केला. दरम्यान, मंगळवारी रात्री युवक आणि युवती बयाण नोंदविण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशनमध्ये आले. तेथून बयाण नोंदविल्यानंतर घरी सतीफैलाकडे जात असताना १२ ते १५ जणांनी अमनला ऑटोतून ओढत त्याच्यावर धारदार शस्त्राने तीन वार केले. त्यात गंभीर जखमी झालेल्या अमनला सुरुवातीला खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. खासगी रुग्णालयात युवकावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी युवकाला उशिरा रात्री अकोला येथे हलविल्याचेही समजते. तथापि, घटनेनंतर युवतीसह अमनचे नातेवाईक शिवाजी नगर पोलीस स्टेशनला पोहोचले होते. त्यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. शिवाजी नगर पोलीस स्टेशन मागील पोस्ट ऑफिसच्या जवळ ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतली.