चिखली : कोरोना प्रतिबंधातमक लसीकरण मोहिमेला सध्या मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, बुलडाणा शहरात अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे एकच पथक असल्याने या यंत्रणेवर ताण वाढला आहे. नागरिकांची गर्दी होत असल्याने गोंधळ उडून कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तथापि गर्दी आणि उद्भवणारे बिकट प्रसंग टाळण्याकरिता शहरात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथक लसीकरणासाठी तैनात करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
केंद्र व राज्य सरकारने १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. बुलडाणा शहरातील नागरिक लसीकरणाला चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, शहरात लसीकरण करण्यासाठी अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे एकच पथक कार्यरत आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. शहरात लसीकरणाची गती पाहता नागरिक ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर ताण वाढला आहे. तसेच अनेक ठिकाणी गोंधळ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत आहे. अशा परिस्थितीत शहरात वॉर्डनिहाय लसीकरण शिबिर घेणे गरजेचे झाल्याचेही तुपकर यांनी जिल्हाधिकारींच्या निदर्शनास आणून दिले असून शहरातील लसीकरणासाठी अतिरिक्त आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी केली आहे.