- मनोज पाटील
मलकापूर : लॉकडाऊनमुळे तेलंगणातील कॉटन मिल मध्ये अडकून चार दिवसापासून उपाशी असलेल्या खामगाव तालुक्यातील 'त्या' २० मजुरांना अखेर शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्य तत्परतेमुळे स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून १८ एप्रिल रोजी राशन तथा जीवनावश्यक वस्तूंचा साठा पुरविण्यात आल्याने 'त्या' भुकेल्या जीवांच्या चेहऱ्यावर दिलासादायक हास्य फुलले आहे. कोरोना संसर्गजन्य विषानुचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वत्र लाॅक डाऊन वाढविण्यात आले आहे. या लाॅकडाऊनची सर्व स्तरावर प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. अशा बिकट परिस्थितीत रोजगार प्राप्ती करिता तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्यातील रामाली गालगुंडम येथील सत्यनारायण कॉटन इंडस्ट्रीज मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील २० मजूर कुटुंबासह लाॅक डॉऊन मुळे अडकून पडले आहेत. ११ एप्रिल पर्यंत पुरेल एवढा जीवनावश्यक वस्तूंचा साठा व राशन त्यांच्याकडे होते. मात्र लॉक डाऊन वाढविण्यात आल्याने त्यांच्याकडील जीवनावश्यक वस्तुंचा साठा जवळपास संपल्यात जमा झाला. तर कंपनी मालकाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून काही मदत मिळेल अशी आस लावून त्यांनी दोन ते तीन दिवस असेल नसेल ते खाऊन व नंतर पाण्यावर दिवस काढले, तर या कंपनीत मजूर अडकून पडले असून त्यांच्याकडे राशन व जीवनावश्यक वस्तू संपल्या आहेत ही बाब बाहेर कुणालाही कळली नाही. सहकारी मजूर आता उपाशी जगू शकत नाहीत ही बाब लक्षात येताच १८ एप्रिल रोजी सकाळी खामगाव तालुक्यातील चांदमारी येथील रहिवासी तथा सद्यस्थितीत या कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले संतोष गवळी यांनी सदरहू प्रकार खासदार प्रतापराव जाधव यांचे खाजगी सचिव डॉ गोपाल डिके मार्फत भ्रमणध्वनी द्वारे खासदार प्रतापराव जाधव यांना कथन केला असता त्यांनी यासंदर्भात तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क केला. नलगोंडा चे जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधीत रामाली गालगुंडम परीसरातील सत्यनारायण कॉटन इंडस्ट्रीज मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास २० मजूर अर्थात ४ कुटुंब गेल्या तीन-चार दिवसांपासून उपाशी आहेत. त्यांना तातडीने आपल्या स्तरावरून योग्य ती मदत करण्याबाबत सूचीत केले. या संवादानंतर स्थानिक जिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी वेळ न दवडता तातडीने स्थानिक तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना सत्यनारायण कॉटन इंडस्ट्रीज कडे रवाना करीत वस्तुस्थिती ची पडताळणी करित तातडीने मदतकार्य करण्याबाबत सूचना केल्या. त्यामुळे स्थानिक प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. तहसीलदार यांनी स्थानिक महसूल कर्मचाऱ्यांनाही तेथे पाठवून आवश्यक तो जीवनावश्यक वस्तुंचा साठा व राशन त्या मजुरांच्या पर्यंत पोहचवून दिला व साहित्य पोहोचल्यानंतर स्थानिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे फोटो काढून माहितीस्तव तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे व्हाट्सअप द्वारे पाठविण्यात आले. जिल्हाधिकार्यांनी सदर फोटो खासदार प्रतापराव जाधव यांना पाठवीत आपण कळविलेले मजूर तेच आहेत का याबाबत खात्री करून घ्यावी असे सूचित केले असता सदरहू मजुर खामगाव तालुक्यातील असल्याबाबतची खात्री खासदार जाधव यांनी खाजगी सचिव डॉ.गोपाल डिके यांचे कडुन करून घेतली. तसेच त्या मजुरांना आवश्यक ते राशन व जीवनावश्यक वस्तूंचा साठा पोहोचविण्यात आल्याची बाब जिल्हाधिकारी यांनी डॉ.गोपाल डिके यांना सांगित याबाबत आपण खासदार प्रतापराव जाधव यांना सूचित करावे अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली. जिल्हाधिकारी प्रशांत पाटील हे मूळ महाराष्ट्रातील असल्याने त्यांनीही आपल्या महाराष्ट्रातील लोकांना आपण बिकट समयी कर्तव्यातून मदत करू शकल्याचे समाधान व्यक्त केले व या अडकलेल्या मजुरांना येत्या काळात काही अडचण उद्भवल्यास त्यांनी थेट आमच्याशी संपर्क केला तरी चालेल अशी आशादायी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी स्थानिक अर्थात बुलढाणा जिल्ह्याच्या परिस्थितीचा धावता आढावा सुद्धा चर्चेदरम्यान खा. जाधवांकडुन जाणून घेतला. एकंदर खासदार प्रतापराव जाधव यांच्या कार्यतत्परतेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील त्या उपाशी अडकलेल्या मजुरांना राशन व जीवनावश्यक वस्तूंचा साठा मिळाल्याने संकटाच्या काळात त्या मजुरांना चांगलाच दिलासा मिळाला असून या कार्याद्वारे खासदार प्रतापराव जाधव यांची कार्यतत्परता सुद्धा प्रकर्षाने समोर आली आहे.
जिल्ह्यातुन परजिल्ह्यात अथवा परराज्यात रोजगार प्राप्ती करीता कुणी गेले असतील अन् या लाॅक डाऊनमुळे कुठे अडकुन अडचणीत सापडले असतील किंबहुना खाण्यापिण्याची समस्या उदभवत असेल तर सदर अडचण थेट अथवा कुणा मार्फतही आमच्या पर्यंत पोहचवा आम्ही तातडीने सदर समस्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू. - प्रतापराव जाधव, खासदार, बुलढाणा.