किनगाव जट्टू येथे लसीकरण शिबिराचे आयोजन करावे अशी मागणी हाेत आहे़ परिसरातील वसंत नगर ,देवा नगर ,खापरखेड लाड, सावरगाव तेली ,आईचा तांडा, भुमराळा इतर गावातील जनतेला कोरोना संसर्ग प्रतिबंध लस घेण्याकरिता बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात जावे लागते़ परंतु प्रत्येक गावचे अंतर आठ ते दहा किलोमीटर असल्याने व कोरोना संसर्ग आजाराचे रुग्ण ग्रामीण भागात सुद्धा आढळत असल्याने किनगाव जट्टू येथे येणाऱ्या पूर्ण बस सेवा बंद आहेत़ तसेच किनगाव जट्टू वरून बीबीला जाण्याकरिता दुसरे कोणतेही वाहन सुरू नसून या भागात राहणारे सर्वसामान्य शेतकरी व शेतमजूर राहत असल्याने खासगी वाहनांची सुद्धा संख्या कमी आहे़ लसीचा पुरवठा दवाखान्यामध्ये कमी होत असल्याने जाण्यास उशीर झाला तर नागरिकांना कधीकधी परत यावे लागते़ त्यामुळे वेळ व पैसा वाया जात असून वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे़ दोन डोस घेतल्याने शरीरातील रोग प्रतिकारशक्ती टिकून राहते़ त्यामुळे कोरोना झाला तरी ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावण्याची गरज पडत नसल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे वयोवृद्ध नागरिक लस घेण्यासाठी गर्दी करीत आहेत़ किनगाव जट्टू ते बीबी हे अंतर सहा किलोमीटर असून पूर्ण रस्ता तयार करण्याकरिता उखडून टाकलेला असल्याने ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे़ ज्येष्ठांसाठी किनगाव जट्टू येथेच लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी हाेत आहे़
ज्येष्ठांची लसीकरणासाठी दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:36 AM