अंजनी खुर्द : परिसरात लांडग्याने हैदाेस घालत दाेन शेळ्या फस्त केल्या. ही घटना १३ ऑक्टाेबर राेजी घडली़ या घटनेत शेतकऱ्याचे ४० हजारांपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, वनविभागाने १४ ऑक्टाेबर राेजी घटनेचा पंचनामा केला आहे. वनविभागाने शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे़
अंजनी खुर्द येथील अमाेल लक्ष्मण गायकवाड यांनी शेतात चार शेळ्या आणि १० पिल्ले झाडाखाली बांधली हाेती. दरम्यान, दबा धरून बसलेल्या लांडग्याने या शेळ्यांवर हल्ला करीत दाेन शेळ्या फस्त केल्या. एका शेळीला हल्ला करून जखमी केले. या घटनेत शेतकऱ्याचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वनविभागाने मदत देण्याची मागणी अमोल गायकवाड व रामदास गायकवाड यांनी केली आहे़ दरम्यान, १४ ऑक्टाेबर राेजी पशुधन अधिकारी डाॅ़ खेडेकर आणि डाॅ़ मुसळे यांनी मृत शेळ्यांचा पंचनामा केला़ यावेळी वनविभागाचे चाैधरी उपस्थित हाेते़