खामगाव (बुलढाणा) : मुलीच्या घरी जाऊन ‘तू मला आवडतेस, आपण लग्न करू, नकार दिल्यास तुझ्यासह कुटुंबाला ठार मारेन,’ अशी धमकी देत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावातून पळवून नेलेल्या अल्पवयीन कुमारिकेला गेल्या आठवडाभरापासून अकोट शहरातील एका बांधकामाधीन इमारतीच्या पत्र्याच्या खोलीत डांबून ठेवल्याची घटना २ मार्च रोजी उघडकीस आली. या प्रकरणी प्रमुख आरोपीसह त्याला सहकार्य करणारी त्याची मावशी, दोन भाऊ व आईविरुद्ध पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आरोपी व त्याच्या भावाला अटक केल्यानंतर तीन दिवसांची कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील १७ वर्षीय बालिकेला गावातील मुख्य आरोपी श्याम गणेश गायगोळ (२८), भारत गणेश गायगोळ (२६), उषा गणेश गायगोळ (रा. जळका भडंग), वेणूबाई भिसे (रा. लामकानी) या आरोपींनी १९ फेब्रुवारी रोजी धमक्या देत बळजबरीने तिच्या घरातून बाहेर काढून पळवून नेले. कुटुंबातील सदस्यांनी याबाबत पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर आरोपींचा सुगावा लागत नसल्याने ठाणेदार सतीश आडे यांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला. मुलीला डांबून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती मिळवली.
अकोट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधून मुलीला ताब्यात घेतले. बालिकेच्या जबाबानुसार आरोपींनी घरातून उचलून नेत बळजबरीने फूस लावून पळविले. आरोपीने स्वतःच्या दुचाकीवर बसवून शेगावला दोन तास ठेवले. तेथून चारचाकी वाहनातून अकोट शहरात नेले. तेथे बांधकाम झालेल्या इमारतीच्या टिनशेडमध्ये ठेवून बाहेर निघाल्यास जीवानिशी मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४(अ), ३५४(ड), ३६३, ३६६, ३६८, ५०६ प्रमाणे गुन्हे दाखल केले. अधिक तपास ठाणेदार सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकाँ अनिल इंगळे, गोपाळ सोनोने करीत आहेत.
आठ दिवस टिनशेडमध्ये डांबले... ठार मारण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या मुलीला दुचाकी क्रमांक एमएच ३० - बीजे २१२५ वर बसवून शेगाव येथे नेले. त्यानंतर आरोपीची मावशी असलेल्या अकोटमधील महिलेकडे नेले. त्या ठिकाणी एका टिनशेडमध्ये गेल्या आठ दिवसांपासून ठेवले. यादरम्यान तिला दिवसातून फक्त जेवण मिळायचे. अंगावर असलेल्या कपड्यांवरच तिने आठवडा काढला.