रुईखेड मायंबा : येथील जि. प. शाळेत बदलीने रिक्त झालेल्या जागांवर दाेन शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी पालकांनी केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून या मागणीकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने २४ फेब्रुवारी रोजी पालकांनी जि. प. शाळेला कुलूप लावून शाळा बंद आंदोलनाला सुरुवात केली. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विषय व भाषा शिक्षक १५ डिसेंबर २०२३ रोजी कार्यमुक्त झाले. मात्र, दोन महिने उलटूनही या जागेवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. शिक्षक देण्याच्या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शिंदे, सदस्य डॉ. साहेबराव सोनुने यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. बिआरसी व केंद्र प्रमुख यांची ५ ते ६ वेळेस भेट घेतली. मात्र, दोन ते तीन दिवसात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे केवळ आश्वासन मिळाले. यामुळे २० फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी व केंद्र प्रमुखांना निवेदन देण्यात आले. शाळेला २४ फेब्रुवारीपर्यंत शिक्षक न मिळाल्यास शाळा बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शिक्षक न मिळाल्याने शाळेला कुलूप लावून प्रत्यक्ष आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी सरपंच अनिल फेपाळे, उपसरपंच सिद्धार्थ मगर, पोलिस पाटील समाधान उगले, बबनराव फेपाळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप शिंदे, उपाध्यक्ष सिद्धेश्वर सोळंके, सदस्य डॉ. साहेबराव सोनुने, विलास उगले, संदीप उगले, सारंगधर उंबरकर, अमोल फोलाने, अंबादास साळवे, रवी गिरी, विष्णू म्हस्के, शिवाजी नपते, सुनील रामेकर, सांडू डुकरे, कौतिकराव उगले, गंजीधार उगले, शरद उगले, अनिल किलबिले आदी पालक उपस्थित होते.शाळा बंद आंदोलनाच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास शासन जबाबदार असणार आहे. शाळेला शिक्षक मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे.संदीप शिंदे,अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, रुईखेड मायंबा.आम्हाला दोन महिन्यांपासून भाषेचे शिक्षक नसल्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षण विभागाने याची दखल घेऊन शिक्षकांची नियुक्ती करावी.नितेश सिद्धेश्वर सोळंके,विद्यार्थी रुईखेड मायंबा.