बुलडाणा : पतसंस्थेने परस्पर धनादेशाद्वारे खात्यातून पैसे काढून घेतल्याचा आरोप करीत जमानतदाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर घडली. मात्र ठाणेदार शिवाजी कांबळे यांच्यासह पोलिसांनी वेळीच पकडल्याने पुढील अनर्थ टळला. संजय भुजंगराव जाधव यांनी २०१५ मध्ये शिवसाई पतसंस्थेच्या तुळशीनगरातील मुख्यालयातून ६० हजारांचे कर्ज उचलले होते. बबन जोगदंड यांनी जामिनदार म्हणून स्वाक्षरी केल्या होत्या. २०१७ पर्यंत म्हणजेच दोन वर्षांत परतफेड करण्याचा कालावधी ठरवून देण्यात आला होता. मात्र, संजय जाधव यांनी हप्ते थकविले. शिवसाई पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकांनी वेळोवेळी कर्ज भरण्याबाबत पत्र दिले. तरीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेने जमानत घेणारे बबन जोगदंड यांच्याशी संपर्क केला. सुरुवातीला त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांनी धनादेश दिला. खामगाव अर्बन बँकेच्या बबन जोगदंड यांच्या खात्यातून ८५ हजार रुपयांची कर्जाची रक्कम शिवसाई पतसंस्थेने वटवून घेतल्याचे व्यवस्थापकांनी सांगितले. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्याने आधी पतसंस्थेने कर्जदाराची मालमत्ता जप्त करायला हवी होती, माझ्या खात्यातून धनादेश वटवून रक्कम कपात करून अन्याय केल्याचा आरोप बबन जोगदंड यांनी केला. यामुळेच आपण जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहन करायला गेलो होतो, असे त्यांनी सांगितले. आत्मदहनाचा कुठलाही इशारा वा निवेदन न देताच डीडीआर कार्यालयासमोर रॉकेलची कॅन घेऊन एक जण गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार शिवाजी कांबळे आपल्या सहकाºयांना सोबत घेऊन तातडीने पोहोचले व बबन जोगदंडला ताब्यात घेण्यात आले.
बुलडाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 6:06 PM