खामगाव: एटीएममध्ये भरावयाची रक्कम स्वत:च्या फायद्यासाठी वापरल्याप्रकरणी फरार असलेल्या एका आरोपीच्या घराची मंगळवारी शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. तर दोन आरोपींची बँकखाती गोठविली.
विविध बँकांच्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करण्याची जबाबदारी असलेल्या एटीएम सर्व्हीस असोसिएटस्शी संगणमत करून पाच जणांनी ४९ लाखाचा अपहार केल्याचे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले. याप्रकरणी लॉजीकॅश सोल्युशनचे शाखा व्यवस्थापक चेतन अशोक धुळे रा. औरंगाबाद यांच्या तक्रारीवरून एटीएम सर्व्हीस असोसिएटस् मनोहर माणिकराव खेडेकर, पत्रकार योगेश हजारे, इद्रिस आणि त्याचे वडील जहीर यांच्यासोबतच इद्रिसचा मित्र साजीद याच्या विरोधात कलम ४०६, ४०८, ४०९ (३४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनोहर खेडेकर पोलिस कोठडीत असून उर्वरित चारही आरोपी फरार आहेत. फरार आरोपींपैकी इद्रिसच्या जुनाफैल भागातील घराची शहर पोलिसांनी झाडाझडती घेतली. पोलिस निरिक्षक संतोष ताले यांच्या नेतृत्वात भोपळे, संतोष वाघ, एपीसी प्रियंका राठोड, अंजूम शेख, दिनेश घुगे, धंदर यांनी ही कारवाई केली. तर पत्रकार योगेश हजारेच्या एबीआय आणि सीबीआय या दोन बँकेतील तर इद्रिसचे एसबीआय बँकेतील खाते गोठविले. दरम्यान, आरोपींचे मोबाईल बंद असल्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर आणि एडीआर डाटाही गोळा केल्याचे समजते.
आरोपींच्या बांधकामाच्या तिन्ही साईटची पाहणी!
एटीएम अपहार प्रकरणातील रक्कम व्यावसायिक फ्लॅट तसेच व्यापारी गाळे बांधण्यासाठी वापरण्यात आल्याची कबुली पोलिस कोठडीत असलेल्या मनोहर खेडेकर यांने दिली. त्यानुसार मंगळवारी शहर पोलिसांनी आरोपी योगेश हजारे, इद्रिस आणि खेडेकर यांच्या बांधकाम साईटची पाहणी केली. पोलिस आरोपींच्या मागावर असून, एका आरोपीचे लोकेशन मिळाल्याचा सुत्रांचा दावा आहे. या आरोपीस अटक करण्यासाठी पोलिसांनी व्यूहरचना केल्याची माहिती आहे.