- भगवान वानखेडे
बुलढाणा - पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संस्थेशी संबंधाच्या संशयावरुन बुलढाण्यातील दोघांना एटीएसने ताब्यात घेतले. ही कारवाई २७ सप्टेंबर रोजी पहाटे करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या दोघांची सध्या चौकशी सुरु आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि दहशतवाद विरोधी पथकाद्वारे राज्यभर मागील काही दिवसांपासून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संबंधित असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्याचे सत्र सुरु आहे. आता हे लोण बुलढाण्यापर्यंत येऊन पोहचले असून, २७ सप्टेंबर रोजी पहाटे दरम्यान दोन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. या दोघांची कसून चौकशी केली जात आहे. मात्र याचवेळी एटीएसने दोन जणांना ताब्यात घेतल्यामुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही समर्थकानी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. याप्रकरणी शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध कारवाई केली आहे. हे घडत नाही तोच पुण्यात झालेल्या घोषणेचा निषेध नोंदविण्यासाठी बुलढाण्यातील हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणा देत आंदोलन केले.
संशयीताना ताब्यात घेतल्यानंतर याप्रकरणी बुलढाणा पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत असल्याने संशयीतांची नावे समोर आली नाही. ही कारवाई दहशतवाद विरोधी शाखा (एटीएस), बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांनी केली.