आरोपींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : महाले
चिखली : सतीश गुप्त यांच्यावरील हल्ला हा माझ्या कुटुंबातील व्यक्तीवर हल्ला असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी म्हटले आहे. औरंगाबाद ते नाशिक हा रस्ता मुख्य रस्ता असून अत्यंत वर्दळीचा रस्ता आहे. हा रस्ता २४ तास सतत वाहत असतो. अशा वर्दळीच्या ठिकाणी गाड्या अडवून प्रवाशांच्या गाड्यांवर दरोडा टाकणे, मारहाण करणे, लूट करणे हे सराईत गुन्हेगारांचेच काम असल्याने राज्यात कायद्याचे राज्य आहे किंवा नाही असा सवाल देखील आमदार महाले यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शासन होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्यावतीने निषेध
सतीश गुप्त यांच्यावरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेधार्थ १८ सप्टेंबर रोजी भाजपाच्यावतीने ठाणेदार अशोक लांडे यांच्यामार्फत निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, सुहास शेटे, जसवंत श्रीवास्तव, नगरपरिषद गटनेते प्रा. डॉ. राजू गवई, शेख अनिस, अंकुशराव पाटील, अशोक अग्रवाल, विजय नकवाल, नगरसेवक गोविंद देव्हडे, संजय अतार, सुभाषआप्पा झगडे, सुदर्शन खरात, अनुप महाजन, शैलेश बाहेती, सतीश शिंदे, सुनीता भालेराव, कल्पना ढोकने, ज्ञानेश्वरी केसकर, विक्की हरपाळे, ॲड.संजय सदार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.