लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: आठवडी बाजारातील भंगार व्यावसायिक राजेंद्र इंगळे यांच्यावरील प्राणघातक हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी तथा नगर पालिकेचा कर्मचारी आनंदमोहन अहीर यास शनिवारी शहर पोलिसांनी अमरावती येथून अटक केली. घटनेनंतर तब्बल अडीच महिन्यांनी मुख्य आरोपी आनंदमोहन अहीर आणि त्याच्या आदित्य नामक मुलास अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे. आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक नगर पालिका हद्दीतील आणि आठवडी बाजारातील दुकानाच्या जागेसाठी पैशांची मागणी करून दबावतंत्राचा अंवलंब करीत नगरपालिका कर्मचारी आनंदमोहन अहीर याच्यासोबतच १५ जणांनी संगनमत, कट रचून भंगार व्यावसायिक राजेंद्र नामदेव इंगळे यांच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात आठवडी बाजारातील भंगार व्यावसायिक राजेंद्र, गुलाब, निलेश आणि अभय इंगळे यांचा समावेश होता. याप्रकरणी राजेंद्र इंगळे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिस स्टेशनमध्ये भादंवि कलम ३०२,३२५, १४३, १४७, १४८, १४९, ५०४ अन्वये नगर पालिका कर्मचारी आनंद मोहन अहीर याच्यासोबत १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून तब्बल सव्वादोन महिने फरार असलेल्या आनंदमोहन अहीर आणि त्याच्या मुलांच्या मागावर पोलीस होते. दरम्यान, शनिवारी सापळा रचल्यानंतर शहर पोलिसांच्या एका पथकाने आनंदमोहन अहीर याच्यासोबतच त्याचा मुलगा आदित्य याला बडनेरा येथील जुन्यावस्तीतील एका घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी मुख्यसुत्रधारासह ७ आरोपींना अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
चौकट...एका पथकाला चकवा, एका पथकाच्या हाती लागला अहीर०आरोपी मोहनअहीर आणि त्याच्या मुलांच्या शोधार्थ शहर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुनील अंबुलकर यांनी आरोपी आनंदमोहन अहीर याच्याशोधार्थ एपीआय इंगळे आणि गौरव सराग यांच्या नेतृत्वात दोन पथके तयार केली होती. यातील एका पथकाला गत काही दिवसांपासून अहीर चकवा देत होता. मात्र, माहितीच्या आधारे सापळा रचून एपीआय इंगळे, अमरदीप ठाकूर, प्रफुल्ल टेकाडे, युवराज शेळके यांच्या पथकाने अहीरला बडनेरा येथून ताब्यात घेतले.