संग्रामपूर : गावातील विकास कामात अडथळे आणतो, असे म्हटल्यावरून संतप्त झालेल्या उपसरपंचाने सरपंचासह, सरपंचपती व आणखी दोघांवर कटरने वार करून जखमी केले. ही घटना तालुक्यातील वरवट खंडेराव येथे ९ मे रोजी सकाळी घडली. तालुक्यातील वरवट खंडेराव येथील उपसरपंच मनोहर सुशीर यांनी गावातील शौचालयांचे कामाबाबत चौकशीची मागणी पंचायत समितीकडे केली होती. या अनुषंगाने पंचायत समितीचे सहायक बीडीओ व कर्मचारी ९ मे रोजी वरवट खंडेराव येथे गावातील शौचालय बांधकामाच्या पाहणीसाठी आले होते. यावेळी उपसरपंच मनोहर सुशीर यांना अर्ज करुन गावातील विकासकामात अडथळा आणतो, असा आरोप गावातील काहींनी केला. यामुळे उपसरपंच मनोहर सुशीर याने संतप्त होत कटरने हल्ला चढविला. यामध्ये सरपंच फैनीदाबी शेख मुनाफ, सरपंचपती शे.मुनाफ शे.हमजा यांच्यासह इतर दोघांवर कटरने वार करुन जखमी केले. या घटनेची फिर्याद सरपंच फैनीदाबी शेख मुनाफ यांचा दीर शेख लाल शेख हमजा यांनी तामगाव पोलिसांत दिली. या फिर्यादीवरुन तामगाव पोलिसांनी उपसरपंच मनोहर रामभाऊ सुशीर याच्याविरुद्ध अप.नंबर ६३/१७ कलम ३२४, ३२६ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.
उपसरपंचाचा कटरने हल्ला; सरपंचासह चार जखमी
By admin | Published: May 10, 2017 7:13 AM