लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : महाराष्ट्रासह देशाच्या विवीध राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा वसा घेत किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज व श्रीमंत कोकाटे यांच्यावर मुंबईत झालेल्या भ्याड हल्ल्याचा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील विवीध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन हल्लेखोरावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी तहसिलदार सिंदखेड राजा यांच्याकडे केली आहे.
सत्यपाल महाराजांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संतगाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा घेत गावोगावी हजारो कार्यकर्त्यांना व्यसनमूक्त केले. कुटूंबाची होणारी राखरांगोळी सत्यपाल महाराजांच्या प्रबोधनात्मक किर्तनामुळे थांबली. ज्या गावात सत्यपाल महाराजांचे किर्तन होत होते, त्या गावात तरुण पिढी व्यसनापासून व कर्मकांडापासुन दुर चालली होती. फुले, शाहु, आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात सत्यपाल महाराजांच्या या सत्यवाणीने होणारे वैचारीक प्रबोधन तथाकथित जातीय द्वेष पसरविणाऱ्याना सहन झाले नाही आणी त्यामुळेच त्यांच्यावर मुंबईत हल्ला झाला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह विवीध राज्यात या घटनेचे पडसाद ऊमटले आहे. त्याचबरोबर प्रसिद्ध वक्ते इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांच्यावरही हल्ला झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे १९ मे रोजी तहसिलदार सिंदखेड राजा यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदवित हल्लेखोरांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली.
यावेळी राजेंद्र अढाव, प्रविण गिते, तान्हाजी भोपळे , अशोक इंगळे, दिपक नागरे, रामदास कहाळे, विनोद ठाकरे, बुद्धू चौधरी , सतीष देशमुख, डॉ.सुभाष खांदवे, शरद वाघमारे, किशोर पाडमुख, आंबादास म्हस्के, बाबूराव ढाकणे, गजानन जाधव, आकाश जाधव, रोहीत म्हस्के यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते ऊपस्थीत होते.