लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : सद्यस्थितीत पाकिस्तानमधून भारतीय तरूणांना सोशल मिडीयाव्दारे विविध प्रलोभने दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. असाच प्रकार चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथील एका किशोरवयीन मुलासोबत घडला आहे. सुरूवातील अनोखळींशीची मैत्री करण्याची आवड असल्याचे भासवून पुढे ‘आमच्यासाठी काम कर, खूप पैसे मिळतील’ असे अमिष पाकिस्तानातून एका व्यक्तीने दिल्याचे चिखली पोलिसांत दाखल एका तक्रारीवरून उघडकीस आले आहे.चिखली तालुक्यातील पळसखेड जयंती येथील १८ वर्षिय शुभम लोखंडे हा २३ आॅगस्टच्या रात्री ‘व्हॉटस्अॅप’ आपल्या मित्रासोबत ‘चॅटींग’ करत असताना +९२ पासून सुरूवात होणाऱ्या एका अनोळखी नंबरवरून त्यास एक मॅसेज आला. त्यामध्ये ‘हाय मी पाकिस्तानचा अहेमद असून आपणास अनोळखी व्यक्तींशी मैत्री करायला आवडते’ असे नमूद करून सोबत काही फोटो टाकण्यात आले होते. दरम्यान युवकाने त्यास रिप्लाय दिल्यानंतर समोरील व्यक्तीने त्यास ‘हमारे लिये काम करो, आपको बहुत पैसा मिलेगा’ अशा प्रकारचे अमिष देवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान अचानकपणे झालेल्या या ‘चॅटींग’मुळे भांबावलेल्या या युवकाने २४ आॅगस्ट रोजी सदर नंबरवर झालेल्या ‘चॅटींग’च्या ‘स्क्रिनशॉट’सह चिखली पोलिसांत याबाबत रितसर तक्रार दाखल केली आहे. यावरून चिखली पोलिसांनी एनसी दाखल करून घेतला आहे. या प्रकरणी पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत. या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
‘गृ्रप इन्व्हाईट लिंक’चा होतो दुरूपयोग !‘व्हॉटस्अॅप’वर प्रामुख्याने ‘अॅडल्ट कंन्टेंट’ असलेल्या ग्रृपचे लिंक मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड केल्या जातात. याच ग्रृप इन्व्हाईट लिंकव्दारे अनेक पाकिस्तानी व इतर देशातील युवकांचा ग्रृपमध्ये प्रवेश होतो. त्यांच्याव्दारे कळत-नकळत ग्रृप ज्वाईन केलेल्या भारतीय तरूणांना अशापध्दतीने जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न विविध आंतरराष्टÑीय कोड असलेल्या नंबरवरून केल्या जाते. त्यामुळे नागरीकांनी सजग राहण्याची गरज आहे. तथापी अल्पवयीन मुलांच्या हाती स्मार्टफोन देताना त्यांच्याहातून चुकीच्या गोष्टी घडू नयेत याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.